
यावल हत्याकांडाची एसआयटी चौकशी करा; एकता संघटनेची मागणी
यावल: येथील बाबूजीपुरा परिसरातील अवघ्या ६ वर्षांच्या हन्नान खान या निष्पाप मुलाच्या क्रूर हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर एकता संघटनेने आज अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
या भेटीदरम्यान एकता संघटनेचे प्रतिनिधी फारुख शेख यांनी पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन दिले, ज्यात चार प्रमुख मागण्यांचा समावेश आहे:
- हन्नानच्या हत्येची एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी.
- पुढील ३० दिवसांत या प्रकरणाचे आरोपपत्र (charge-sheet) दाखल करावे.
- या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात (Fast-track court) करावी.
- पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा.
यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी संघटनेला आश्वासन दिले की, पोलीस तपासात कोणतीही हलगर्जीपणा केली जाणार नाही. ते म्हणाले, “या प्रकरणातील दोषींना मृत्यूदंडापेक्षा कमी शिक्षा मिळणार नाही.” त्यांनी उपस्थित लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत, न्याय निश्चितपणे मिळेल असे आश्वासन दिले.
यावेळी एकता संघटनेचे फारुख शेख यांनी इशारा दिला की, जर ३० दिवसांत योग्य कारवाई झाली नाही तर जनतेच्या सहभागाने मोठे आंदोलन केले जाईल. या बैठकीला जळगाव, फैजपूर, चिनावल आणि सावदा येथील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम