युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे- रक्षा खडसे

बातमी शेअर करा...

युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे- रक्षा खडसे

खासदार क्रीडा महोत्सवातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होणार

जळगाव
युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडाक्षेत्र महत्वाचे असून प्रत्येक युवकांनी खेळ खेळले पाहिजे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. असे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले.

भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राउंडवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सव २०२५ (रावेर लोकसभा मतदारसंघ) च्या भव्य उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, रावेरचे आमदार अमोल जावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, बुलढाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, तसेच विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा राज्यमंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या की, २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने निश्चित केले असून, त्यासाठी पुढील दहा वर्षांत खेळ प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच उद्देशाने खासदार क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, रावेर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या क्रीडा महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातून सुमारे २५ हजार खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यापैकी विविध टप्प्यांतून निवड झालेले खेळाडू अंतिम सामन्यांसाठी भुसावळ येथे दाखल झाले आहेत. प्रत्येक तालुक्यातून ७०० ते ८०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

खेळो इंडिया अभियानाच्या माध्यमातून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) च्या केंद्रांमध्ये खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आहार, कोचिंग व स्पोर्ट्स सायन्सच्या आधारे मार्गदर्शन दिले जाते. या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची साई केंद्रासाठी निवड केली जाणार असल्याचेही श्रीमती खडसे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना थेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगतीची संधी मिळणार आहे.

क्रीडाक्षेत्र हे केवळ पदक मिळवण्यासाठी नसून शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. फिट इंडिया मिशनच्या माध्यमातून युवकांना मोबाईल व्यसन, तणाव व नैराश्यापासून दूर ठेवण्यासाठी क्रीडा हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. खेळामुळे शिस्त, संघभावना, जिंकणं-हरणं स्वीकारण्याची क्षमता विकसित होते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळाडूंनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया, रेल्वे प्रशासन यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेमध्ये विविध शाळा, महाविद्यालयाचे खेळाडू सहभागी झाले असून हा क्रीडा महोत्सव तीन दिवस चालणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम