युवकावर जीवघेणा हल्ला; तिघे अटकेत

बातमी शेअर करा...

युवकावर जीवघेणा हल्ला; तिघे अटकेत
एरंडोल प्रतिनिधी :
एरंडोल शहरातील नागोबा मढी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हल्ल्यात झाले. चॉपर व तलवारीने केलेल्या हल्ल्यात प्रसाद सुनील पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला आहे. प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास निहीर लक्ष्मण मराठे व त्याचा मित्र प्रसाद सुनील पाटील हे दुचाकीवरून (एमएच-१९ डीएन-०८४२) कैटवाडी येथे मित्र ऋषी पाटील याला भेटण्यासाठी गेले होते. मात्र ऋषी पाटील घरी नसल्यामुळे ते परत येत असताना बापू बन्सी महाजन यांच्या घरासमोर यशवंत पाटील व गजानन पाटील यांनी त्यांची दुचाकी अडवली. ‘या गल्लीत का आला?’ असे विचारत दोघांनी शिवीगाळ सुरू केली.
शिवीगाळ का करत आहात, असा जाब विचारताच यशवंत पाटील याने ‘आज तुम्हाला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी देत कमरेला लावलेला चॉपर काढून प्रसाद पाटील याच्यावर हल्ला केला. प्रसादला वाचवण्याच्या प्रयत्नात निहीर मराठे याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर यशवंत पाटील याने पुन्हा प्रसादच्या पोटावर चॉपरने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी होऊन दुचाकीवरून खाली कोसळला.
याचवेळी गजानन पाटील याने तलवारीने प्रसादच्या पायावर वार करून त्याला अधिक जखमी केले. इतक्यावर न थांबता यशवंत पाटील यांचे वडील शंकर पाटील हे लाकडी दांडका घेऊन घटनास्थळी आले आणि त्यांनी प्रसादच्या डोक्यावर व पायावर मारहाण केली.
गंभीर जखमी अवस्थेत प्रसाद पाटील याला प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास पुढील उपचारांसाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी निहीर मराठे याने दिलेल्या तक्रारीवरून शंकर पाटील, गजानन पाटील व यशवंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम