युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात विकसित भारत घडू शकतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

बातमी शेअर करा...

युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात विकसित भारत घडू शकतो – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

जळगाव प्रतिनिधी दि. ८ :– युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात विकसित भारत घडू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यापीठस्तरीय प्रेरणा शिबिराचे उद्घाटन करताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले.

यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड अमोल पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य केदारनाथ कवडीवाले, नितीन ठाकूर, अमोल मराठे, स्वप्नाली काळे, रासेयोचे संचालक डॉ. सचिन नांद्रे हे होते.

यावेळी कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, आपला देश जगातील सर्वात तरुण संख्या असलेला देश आहे. तरुण ऊर्जेने आणि उत्साहाने भरलेले आहेत. याच तरुणांच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात आपण विकसित भारत घडवू शकतो. त्यासाठी या तरुणांना योग्य दिशा देण्याची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांचा शिक्षणासोबतच सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून कुलगुरू प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. निश्चितच या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास करत जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करावे असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यापीठाच्या माध्यमातून श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्याचा प्रस्ताव सिनेटच्या बैठकीत मांडला. कुलगुरू महोदयांनी त्याला लगेच मान्यता दिली आणि याच माध्यमातून या शिबिराच्या आयोजनाला सुरुवात झाली आहे. यावर्षी युद्धजन्य परिस्थिती आणि देशासमोरील आव्हाने या संदर्भात तरुण काय योगदान देऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञांचे व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे.

विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर घालण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजविण्यासाठी विद्यापीठात ८ जुलै ते १४ जुलै २०२५ असे सात दिवसीय कुलगुरू प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २७० स्वयंसेवकांनी ऑनलाईन नोंदणी करत सहभाग नोंदवला आहे.

रासयो चे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, पुढील सात दिवस या शिबिरात जलसंवर्धन नियोजन, आरोग्यमित्र तयार करणे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार स्वयंसेवकांमध्ये कौशल्य विकसित करणे, पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे, संविधान महोत्सव, युवा भारत, राष्ट्रनिर्मिती साठी योगदान, स्थानिक रोजगाराच्या विविध संधी भारत व्हिजन १९४७ : अमृत महोत्सव ते सुवर्ण महोत्सव या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांच्या व्याख्यानांसह योग शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पाटील यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले. यावेळी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य, जिल्हा समन्वयक, विभागीय समन्वयक, विविध महाविद्यालयातील शिक्षक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम