
योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे घवघवीत यश
जळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् फेडरेशनतर्फे छत्रपती संभाजीनगर व चंद्रपूर येथे दि. ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावत पदकांची कमाई केली आहे. जुलै महिन्यात जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशनमार्फत झालेल्या निवड चाचणीत सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूंना राज्यस्तरावर सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.
या स्पर्धेत डॉ. शरयू विसपुते यांनी फॉरवर्ड बेंड योगासन प्रकारात सुवर्णपदक तसेच ट्विस्टिंग योगासन प्रकारात कांस्यपदक मिळवून दुहेरी यश संपादन केले. किरण लुल्ला यांनी ट्विस्टिंग योगासन प्रकारात रौप्यपदक, तर चंचल माळी यांनी सुपाईन योगासन प्रकारात रौप्यपदक पटकावले. याशिवाय दीपाली महाले यांनी हॅण्ड बॅलन्स योगासन प्रकारात कांस्यपदक मिळवले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष सतीशजी मोहगावकार, उपाध्यक्ष डॉ. देवानंद सोनार, सचिव प्रा. पंकज खाजबागे व कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. स्पर्धकांना मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागामार्फत प्रा. पंकज खाजबागे यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवलेल्या डॉ. शरयू विसपुते यांना आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली योगकला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम