
रस्तालुटीच्या तयारीत असलेले सात सराईत गुन्हेगार चोपड्यात अटक
पोलिसांची धडक कारवाई, गावठी कट्टे व तलवारी जप्त
रस्तालुटीच्या तयारीत असलेले सात सराईत गुन्हेगार चोपड्यात अटक
पोलिसांची धडक कारवाई, गावठी कट्टे व तलवारी जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – मध्यरात्री धोकादायक व प्राणघातक हत्यारे घेऊन रस्तालुटीच्या तयारीत थांबलेल्या सात सराईत गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तूल, दोन तलवारी व १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
२७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास शहर पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना शिरपूर बायपास रोडवरील एका पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट डिझायर कारमध्ये (एमएच २६ सीएच १७३३) काही संशयित व्यक्ती थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि रणगाडा चौकाजवळ कार आढळली.
कारमध्ये पाच जण बसलेले व दोन बाहेर पहारा देत उभे असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांकडे पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी चतुराईने घेराव घालत सातही जणांना पकडले.
झडतीदरम्यान दोन आरोपींच्या कमरेला लोडेड गावठी कट्टे, तर गाडीतून दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन मिळून आले.
अटक करण्यात आलेले आरोपी
दिलीपसिंह हरीसिंह पवार (३२), विक्रम बाळासाहेब बोरगे (२४), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२५), अमनदीपसिंग अवतरासिंग राठोड (२५), सद्दाम हुसेन महंमद आमिद (३३) (सर्व रा. नांदेड, संभाजीनगर), तसेच चोपडा येथील अक्षय महाले (३०) व जवेश महाजन (३०) यांचा समावेश आहे.
आरोपींवर खून, दरोडा, खंडणी व अपहरणाचे गुन्हे
तपासात या आरोपींवर नांदेड, संभाजीनगर (वैजापूर) व चोपडा परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, दहशत निर्माण करणे, अग्निशस्त्रे बाळगणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींपैकी दोघे टाडा कायद्यान्वये स्थानबद्धतेतून नुकतेच मुक्त झाले आहेत, तर एक आरोपी दरोड्याच्या गुन्ह्यात फरार होता.
नांदेड परिसरात या टोळीची मोठी दहशत असून, ते शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करणे, अपहरण करणे व धमकीचे व्हिडिओ तयार करून लोकांना धमकावणे अशी कृत्ये करत असल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने केली. पथकात सपोनि एकनाथ भिसे, पोहेकॉ हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जयागे, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मंदे, विनोद पाटील, चालक किरण धनगर, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ प्रकाश ठाकरे आदींचा समावेश होता.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम