
रस्त्यावर ट्रक अडवून चालकाला चाकूचा धाक
रस्त्यावर ट्रक अडवून चालकाला चाकूचा धाक
आरोपीला अटक
अमळनेर | गलवाडे रस्त्यावर ट्रक अडवून चालकाच्या गळ्याला चाकू लावून एक हजार रुपये हिसकावणे आणि मालकाकडून एक लाख रुपयांची खंडणी मागून खून करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२७ एप्रिल) पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पॅरोलवर असलेल्या गुन्हेगार कैलास नवघरे याला अटक केली आहे.
अनिल अश्रूबा विलग (रा. कोनोसी, ता. शिवगाव, जि. अहिल्यानगर) हे स्वप्नील झिने यांच्या मालकीच्या हायवा ट्रक (MH-16-CE-4797) चे चालक आहेत. भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे जात असताना, गलवाडे रस्त्यावर मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी ट्रक आडवला. त्यापैकी एका व्यक्तीने स्वतःची ओळख “कैलास नवघरे – अमळनेरचा डॉन” अशी करून दिली. त्याने ट्रकच्या केबिनमध्ये चढून चालकाच्या गळ्याला चाकू लावून एक लाख रुपयांची मागणी केली.
यावेळी आरोपींनी चालकाच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. दुसऱ्या आरोपीने स्वतःचे नाव मोझम शेख असल्याचे सांगितले. आरोपींनी ट्रक मालकाला फोन करून पैसे न दिल्यास चालकाचा खून करण्याची धमकी दिली आणि ट्रक कॉलनीकडे नेण्याचा प्रयत्न केला.
चालकाच्या सतर्कतेमुळे मालकाने तत्काळ अमळनेर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून मोझम शेख आणि तिसरा अनोळखी आरोपी पळून गेले, मात्र कैलास नवघरेला अटक करण्यात आली.
कैलास नवघरे याने यापूर्वी खून प्रकरणात शिक्षा भोगली असून, तो पॅरोलवर बाहेर आला होता. २७ एप्रिल रोजी त्याची तुरुंगात परत जाण्याची वेळ होती, मात्र त्याआधीच तो नव्या गुन्ह्यात अडकला. या प्रकरणी तिघांविरुद्ध जबरी चोरी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम