
रांजणगाव सांडस, शिरूर (पुणे) येथे डांबून ठेवलेले १४ ऊसतोड मजुरांची सुखरूप सुटका !
रांजणगाव सांडस, शिरूर (पुणे) येथे डांबून ठेवलेले १४ ऊसतोड मजुरांची सुखरूप सुटका !
जिल्हा प्रशासन, जन साहस फाउंडेशन आणि निर्माण संस्थेच्या प्रयत्नांना यश
शिरूर (पुणे) : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव सांडस येथे बळजबरीने डांबून ठेवलेले जळगाव जिल्ह्यातील १४ ऊसतोड मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नंदू रंगकिसे व आप्पा रंगकिसे या दोघांनी मजुरांना ऊसतोडीसाठी नेले होते; मात्र त्यांच्याकडून अन्य कामे करून घेत, मोबदला न देता त्यांना बंदिस्त ठेवले जात होते. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच जन साहस फाउंडेशन आणि निर्माण संस्थेने तातडीने हस्तक्षेप करून जिल्हा प्रशासनाचा दरवाजा ठोठावला.
जळगाव जिल्ह्यातील आमलदे, पिंपरखेड आणि धुळे जिल्ह्यातील न्याहोडोद येथील हे मजूर असून, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात नेऊन त्यांच्याकडून ऊसतोडीसोबतच अन्य कामे जबरदस्तीने करून घेतली जात होती. मोबदला मागितल्यावर त्यांना धमकावणे, नजरकैदेत ठेवणे असे अमानवी वागणूक दिली जात होती. मजुरांनी आपली व्यथा घरी सांगितल्यानंतर तक्रारदार मंगा सुकदेव भील व पिंटू आबा भील यांनी जन साहस संस्थेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधला.
याप्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा. सोनल पाटील मॅडम यांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत शिरूर उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, निवासी तहसीलदार गोसावी आदींशी संपर्क साधला आणि बंधकामगार कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले.
जळगाव जन साहस संस्थेचे निलेश शिंदे, सय्यद रुबीना, सोनम केदार, धुळे जन साहसचे राजेंद्र खैरनार, पुण्याचे सिद्धी भाईशेटे, सुनील म्हस्के, सागर कलशेट्टे तसेच ॲड. विरसेन काजळे यांच्या समवेत धाडसत्र राबवून सर्व मजूरांची सुटका करण्यात आली. त्यानंतर मजुरांना पुणे विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात हजर करून त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यात आली.
यानंतर सर्व मजूरांना जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आणण्यात आले व त्यांचे पुनर्वसन आणि सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. अखेरीस त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पाठवण्यात आले.
बंधमुक्त ऊसतोड कामगारांची नावे पुढीलप्रमाणे :
आबा भिल, छोट्या बाई आबा भिल, शिवानी पिंटू भिल, इंदूबाई भिल, पायल आबा भिल, दादाभाऊ रतन जाधव, वैशाली रतन जाधव, गंगा दादाभाऊ जाधव, अमृता दादाभाऊ जाधव, भागू दादाभाऊ जाधव, छोटी दादाभाऊ जाधव, बापू भगवान भिल, जिजाबाई भगवान भिल, आनंद भगवान भिल.
हे सर्व मजूर सध्या सुरक्षित असून, प्रशासनाच्या सहकार्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम