
राज्यातील पहिलं पाऊल! शिक्षकांसाठी ‘इंडस्ट्री इमर्शन योजना’ कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात राबविणार
राज्यातील पहिलं पाऊल! शिक्षकांसाठी ‘इंडस्ट्री इमर्शन योजना’ कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात राबविणार
जळगाव, दि. ३ (प्रतिनिधी) : शैक्षणिक ज्ञान व औद्योगिक कौशल्य यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘शिक्षकांसाठी इंडस्ट्री इमर्शन योजना’ राबविण्यात येणार आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. राज्यात अशी योजना राबवणारे हे एकमेव विद्यापीठ ठरणार आहे.
विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने या योजनेची नियमावली तयार केली आहे. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यापीठातील शिक्षकांनी प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात जाऊन तांत्रिक कौशल्ये, आधुनिक यंत्रणा, कार्यपद्धती व तंत्रज्ञानाचा अनुभव घेणे, उद्योग क्षेत्रातील आव्हाने समजून घेणे आणि त्या आधारे अभ्यासक्रमात सुधारणा करणे.
या योजनेंतर्गत शिक्षकांनी उद्योगांमध्ये एक आठवडा प्रत्यक्ष कार्यानुभव घ्यायचा आहे. यावेळी त्यांनी निरीक्षण व माहिती संकलन करून विद्यापीठास अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालाच्या आधारे अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित उद्योगांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व रोजगार संधी मिळवून देण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रत्येक वेळेस एका प्रशाळेतील जास्तीत जास्त दोन शिक्षकांना योजनेचा लाभ घेता येईल. संबंधित विभागाने आपापल्या विषयानुसार उद्योगांची निवड करायची आहे. शिक्षकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी प्रवास व इतर भत्ते विद्यापीठाकडून दिले जाणार आहेत.
शिक्षकांचे औद्योगिक क्षेत्रातील व्यवहारिक ज्ञान वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण पाऊल म्हणून या योजनेची नोंद घेतली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम