
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांना हिरवा कंदील
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांना हिरवा कंदील
१५ जानेवारीला मतदान; १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार
मुंबई / जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला असून राज्य निवडणूक आयोगाने आज एकाच टप्प्यात २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार जळगाव महापालिकेसह संबंधित सर्व महापालिकांसाठी बुधवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून गुरुवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल घोषित केले जाणार आहेत. ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त दीपक वाघमारे यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रशासकांच्या माध्यमातून चालणाऱ्या महापालिकांच्या कारभारावर लवकरच लोकनिर्वाचित प्रतिनिधींचा अंकुश प्रस्थापित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दि. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची तयारी आता अंतिम टप्प्यात जाणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की, मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबवली जात आहे. राज्यातील सर्वसाधारण महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आखण्यात आला असून यामध्ये राज्यातील एकूण २९ महापालिकांचा समावेश आहे.
आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या २९ पैकी २७ महापालिकांची मुदत आधीच संपलेली आहे. त्यापैकी पाच महापालिकांची मुदत २०२० मध्ये, तर मुंबईसह १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. याशिवाय चार महापालिकांची मुदत २०२३ मध्ये पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांना अखेर निश्चित दिशा मिळाल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून संभाव्य उमेदवार, पक्षीय गट आणि आघाड्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी काळात उमेदवारी अर्ज, युती-आघाड्यांचे गणित आणि प्रचाराच्या जोरदार रणधुमाळीत जळगाव शहर पुन्हा एकदा निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम