
राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा
राज्य महोत्सवांतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा
जळगाव – राज्यातील गणेशोत्सव आता ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाणार असून, यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुका या तिन्ही स्तरांवर आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या https://www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरील ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलवरून ऑनलाइन करता येतील. अर्जाची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२५ असून, स्पर्धा विनामूल्य आहे. फक्त नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे.
तालुकास्तरावर एक मंडळ निवडले जाईल, तर जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन विजेत्या मंडळांचा गौरव केला जाणार आहे.
परीक्षण निकष :
मंडळांचे मूल्यांकन विविध घटकांवर केले जाणार आहे. त्यात सांस्कृतिक स्पर्धा व उपक्रम, गड-किल्ले व स्मारक संवर्धन, सामाजिक व शैक्षणिक कार्य, महिला सक्षमीकरण, देशी खेळांचा प्रचार, विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, तसेच प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती यांचा समावेश असेल.
लाईव्ह दर्शन सुविधा :
गणेशोत्सव काळात ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव तसेच प्रसिद्ध गणेश मंदिरांचे लाईव्ह दर्शन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नागरिकांना आपल्या गणपतीची छायाचित्रे या पोर्टलवर विनामूल्य प्रकाशित करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि नागरिकांनी पोर्टलद्वारे दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे..

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम