
रायसोनी नगरात मध्यरात्री चार ठिकाणी चोरी: मंदिरातील चांदीच्या पादुका, मूर्ती आणि रोकड लुटली; चड्डी गँग सीसीटीव्हीत कैद
रायसोनी नगरात मध्यरात्री चार ठिकाणी चोरी: मंदिरातील चांदीच्या पादुका, मूर्ती आणि रोकड लुटली; चड्डी गँग सीसीटीव्हीत कैद
जळगाव, ५ ऑगस्ट: रायसोनी नगर परिसरात ३ ऑगस्टच्या मध्यरात्री २:३० वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चार ठिकाणी चोरी करत दहशत माजवली. श्री गजानन महाराज मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरातून चांदीच्या पादुका, धातूची मूर्ती, दानपेटीतील रोकड आणि इतर वस्तू चोरीला गेल्या. याशिवाय, एका घरातून साहित्याची उचकापाचक झाली, तर तिसऱ्या मंदिरातून चोरट्यांनी फक्त पेन ड्राईव्ह चोरला. या घटनांमुळे परिसरात भीती पसरली आहे.
श्री गजानन महाराज मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, दीड फूट उंचीची गणपतीची मूर्ती आणि दानपेटीतील रोकड लंपास केली. दानपेटी बऱ्याच दिवसांपासून उघडली नसल्याने चोरी गेलेली रक्कम किती हे स्पष्ट नाही.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली, तेव्हा इतर दोन मंदिरांमध्येही चोरी झाल्याचे समोर आले. केतन सुरेश चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तुटलेले आढळले, आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले गेले. चोरी गेलेल्या वस्तूंचा तपशील चौधरी कुटुंब परतल्यानंतरच कळेल.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मास्क आणि रुमालाने चेहरा झाकलेले चार संशयित दिसत आहेत, जे चड्डी घालून मंदिर परिसरात फिरताना दिसले. एकाच्या हातात चप्पल, तर दुसऱ्याने चप्पल कमरेला अडकवलेली दिसते. हे फुटेज पहाटे २:३१ वाजताचे आहे.
काशी विश्वनाथ मंदिरातही दानपेटी आणि तिजोरी तोडून रोकड चोरी झाली. शिवनेरी नर्मदेश्वर महादेव मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला, पण दानपेटी नसल्याने चोरटे फक्त पेन ड्राईव्ह घेऊन पसार झाले. या मंदिरात यापूर्वीही सहा महिन्यांपूर्वी चोरी झाली होती.
गजानन मंदिराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने पहाटे चार संशयितांना पाहिले आणि आरडाओरड केल्यानंतर चोरटे पळून गेले. या घटनांमुळे परिसरात दहशत असून, नागरिकांनी पोलिसांना तपास वेगाने करण्याची मागणी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम