
रावेरात तहसीलदार यांची मध्यरात्री धडक कारवाई : वाळू तस्करांचा डंपर जप्त
रावेरात तहसीलदार यांची मध्यरात्री धडक कारवाई : वाळू तस्करांचा डंपर जप्त
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यात वाढत्या वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मध्यरात्री जोरदार कारवाई करण्यात आली. अजंदा रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या MH 19 CX 3495 क्रमांकाच्या डंपरवर अचानक धाड टाकून ते वाहन महसूल विभागाने ताब्यात घेतले. या कारवाईने वाळू माफियांना जबर झटका दिला असून, प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे.
गोपनीय माहितीवरून तहसीलदारांनी महसूल पथकासह सापळा रचून डंपरवर अचूकपणे कारवाई केली. ही धडक इतकी गोपनीय आणि नियोजनबद्ध होती की, तस्करांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. कारवाईनंतर डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, यासंदर्भात कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
या पथकामध्ये तलाठी सुधीर इंगळे, प्रशांत जाधव, आकाश तायडे, मंडळ अधिकारी भांडेकर, अप्पा रसलपूर आणि कोतवाल गणेश चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तहसीलदार स्वतः मैदानात उतरल्यावरच कारवाई होत असल्याचे यावरून स्पष्ट होते. मात्र, फील्डवर कायम असणारे काही अधिकारी केवळ कागदोपत्री कामापुरतेच मर्यादित राहत असल्याचे चित्र उभे राहत आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेत कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या मध्यरात्रीच्या कारवाईनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, वाळू तस्करीविरोधात ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. महसूल विभागाच्या या कृतीमुळे तात्पुरता धोका रोखला गेला असला तरी, यंत्रणेला सातत्यपूर्ण आणि पारदर्शक उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम