
रावेर तालुक्यात दोन गावठी कट्टे विक्रीच्या तयारीत असणाऱ्या दोघांना एलसीबीकडून सिनेस्टाइल पाठलाग करून अटक
रावेर तालुक्यात दोन गावठी कट्टे विक्रीच्या तयारीत असणाऱ्या दोघांना एलसीबीकडून सिनेस्टाइल पाठलाग करून अटक
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यातील पाल येथील दुर्गम भागात सिनेस्टाईल पाठलाग करत दोन गावठी कट्टे विक्रेत्यांना रंगेहाथ अटक केली आहे. या दोघांविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण १.७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ८ जून २०२५ रोजी स.फौ. रवी नरवाडे आणि पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातील दोघे इसम गावठी कट्टे विक्रीसाठी महाराष्ट्रात येत आहेत आणि पाल मार्गे जाणार आहेत. माहिती मिळताच ती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविण्यात आली. त्यांनी पो.उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथक गठीत करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
पथकाने रावेर पोलिस ठाणे हद्दीतील पालजवळील जंगल परिसरात सापळा लावला. सायंकाळच्या सुमारास निळी पगडी घातलेला अंदाजे ४५ वर्षीय इसम (गाडी क्र. एमपी १० झेडसी ९६५०) आणि दुसरा २५ वर्षीय इसम (गाडी क्र. एमपी १० एमव्ही १४६२) या दोघांनी मोटरसायकलवरून परिसरात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत आणि दुसऱ्या बाजूला सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
अंगझडतीदरम्यान दोघांकडून २ गावठी कट्टे, २ मोटरसायकली, २ मोबाईल हँडसेट असा एकूण ₹१,७०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
गोविंदसिंग ठानसिंग बरनाला (वय ४५, रा. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश)
निसानसिंग जिवनसिंग बरनाला (वय २३, रा. उमर्टी, ता. वरला, जि. बडवाणी, ह.मु. सिरवेल महादेव, ता. भगवानपुरा, मध्यप्रदेश)
या दोघांविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम