
रावेर तालुक्यात वीज कोसळून तरुणाचा मृत्यू; चार जण जखमी
रावेर तालुक्यात वीज कोसळून तरुणाचा मृत्यू; चार जण जखमी
रावेर: तालुक्यातील मंगलवाडी ते पाल रस्त्यावर असलेल्या चुनाबर्डी येथे गुरुवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज कोसळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत आणखी चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
मृत तरुणाचे नाव दादाराव उर्फ सोनू कोळपे (वय २०, रा. मुंजलवाडी) असे आहे. घटनेच्या वेळी ठेल्लारी कुटुंब त्यांच्या मेंढ्यांसह चुनाबर्डी परिसरात थांबलेले होते. अचानक वीज कोसळल्याने दादाराव कोळपे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले चार ते पाच जणही जखमी झाले. जखमींना तात्काळ रावेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत पाच मेंढ्यांचाही मृत्यू झाला असून, आणखी चार ते पाच मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले.
एका तरुणाचा अशाप्रकारे आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम