
रावेर पोलिसांची मोठी कामगिरी ; रसलपूरला कत्तलखाना उध्वस्त
रावेर प्रतिनिधी
तालुक्यातील रसलपूर येथे पोलीसांनी एका मोठ्या कारवाईत गोवंश कत्तलखाना उद्ध्वस्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून चौघांना ताब्यात घेतले, तर चौघे पोलीस येताच पळून गेले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ७४० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील रसलपूर येथील कुरेशी मोहल्ल्यात सलीम उस्मान कुरेशी याच्या घरासमोर गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. ते स्वतः तसेच पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस कर्मचारी कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, महेश मोगरे, विशाल पाटील या पथकाने तातडीने रसलपूरकडे धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, आठ इसम सलीम कुरेशी यांच्या घरा समोरील मोकळ्या जागेत खाली बसून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यापैकी चौघांना जागेवरच पकडले, तर उर्वरित चौघे पोलिसांना पाहून पळून गेले. यात वसीम कय्युम कुरेशी, शेख शकील शेख कलीम, सलीम उस्मान कुरेशी,आणि सादिक शेख नुरा यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ४८ रुपये किंमतीचे अंदाजे ७४० किलो गोवंश मांस आणि चार जनावरांची कातडी, १ हजार २०० रुपये किंमतीच्या चार कुऱ्हाडी आणि ८०० रुपये किंमतीचे चार सुरे जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सील करून पंचनामा करण्यात आला . पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल सतिष सानप करीत आहेत .

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम