
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला चोपडा तालुक्याचेही योगदान
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला चोपडा तालुक्याचेही योगदान
चोपडा (प्रतिनिधी) – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून मोझरी आश्रम (जि. अमरावती) येथे यंदाही भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी राज्यभरातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असून, चोपडा तालुक्यातील भक्तगणही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रचारक हरिश्चंद्र कोळी (कोळंबा) यांनी दिली.
मोझरी येथील आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी असून, त्यांचा ५७ वा पुण्यतिथी महोत्सव दिनांक ५ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. या काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक व समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामगीताचार्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या कार्यातून ग्रामीण समाजात स्वच्छतेचे, शिक्षणाचे व सामाजिक ऐक्याचे संदेश दिले. १९६२ पूर्वीच त्यांच्या विचारांचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर झाला होता. त्यांनी आपल्या खंजिरी भजनांच्या माध्यमातून जनतेत जागरूकता निर्माण केली. गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे समकालीन संत असून, दोघांनीही समाजातील अंधश्रद्धा आणि असमानतेविरुद्ध प्रबोधनाचे कार्य केले.
कोळंबा (ता. चोपडा) येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तीन वेळा उपस्थित राहिले होते. त्यांचे दीर्घकालीन अनुयायी असलेले प्रचारक हरिश्चंद्र बाविस्कर यांनी आपले संपूर्ण आयुष्य गुरुदेवांच्या कार्यासाठी समर्पित केले असून, यंदाच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी चोपडा तालुक्यातून भाविकांचा मोठा सहभाग होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम