
राष्ट्रीय कबड्डीपटू जयेश महाजन याचा गौरव
राष्ट्रीय कबड्डीपटू जयेश महाजन याचा गौरव
नवलसिंगराजे पाटील यांच्याहस्ते सन्मान
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीपटू जयेश विकास महाजन याचा पद्मालय गेस्ट हाऊस येथे विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते जयेश महाजनचा सन्मान करण्यात आला.
जयेश महाजनने कबड्डी क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने ज्युनियर राष्ट्रीय, वरिष्ठ राष्ट्रीय आणि फेडरेशन कप स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी बजावत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच प्रो कबड्डी लीगच्या हंगाम ११ व १२ मध्ये यूपी योद्धा संघातून प्रभावी कामगिरी करत कबड्डी रसिकांची मने जिंकली आहेत. याशिवाय खेलो इंडिया युवा खेळ २०२३ आणि २०२४ मध्ये त्याने रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी आयोजित समारंभात नवलसिंगराजे पाटील यांनी जयेशला अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आणि पुढील कारकिर्दीसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. यावेळी विविध सामाजिक व क्रीडाक्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जयेश महाजनच्या चिकाटी, मेहनत आणि शिस्तबद्ध खेळाचे कौतुक करत, त्याच्याकडून भविष्यात भारतीय कबड्डी संघात स्थान मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली. जयेशनेही सर्वांच्या प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आपल्या गावाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम