
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण, भारतीय ज्ञान परंपरा, कौशल्य याला प्राधान्य – कुलगुरू डॉ. माहेश्वरी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण, भारतीय ज्ञान परंपरा, कौशल्य याला प्राधान्य – कुलगुरू डॉ. माहेश्वरी
रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे व्याख्यानाचे आयोजन
जळगाव – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये मातृभाषेतून शिक्षण, भारतीय ज्ञान परंपरा आणि कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना प्राधान्य देऊन विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी प्रतिपादन केले.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये आयोजित व्याख्यानाचे मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष जितेंद्र बरडे, मानद सचिव ॲड. केतन ढाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या पाच वर्षांपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सुरू होते. यापूर्वी देशात दोनदा शैक्षणिक दृष्ट्या मोठे बदल करण्यात आले आहे.
त्यात १९६८ मध्ये कोठारी आयोगाने सर्वांसाठी शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. १९८८ मध्ये के. राममूर्ती यांच्या अध्यक्षते खाली ऑपरेशन ब्लॅक बोर्ड आणि सामायिक प्रवेश परीक्षा पद्धत सुरू केली. त्यानंतर हा तिसरा प्रयत्न असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
संपूर्ण देशातील शैक्षणिक क्षेत्रात सारखेपणा यावा व आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक स्पर्धेत सक्षमपणे आपला ठसा उमटवतील हा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून डॉ. माहेश्वरी यांनी केंद्र शासनाने ७५ वर्षांनी पाश्चिमात्य पगडा असलेली मेकॅले शिक्षण पद्धतीत मोठे परिवर्तन घडवले आहे असे प्रतिपादन केले.
या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शैक्षणिक शाखांमधील बदल शक्य होणार असून बहुविधशाखा पद्धत व एकाच वेळेस दोन पदव्या किंवा अभ्यासक्रम शिकता येणार आहे. या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव देखील मिळणार आहे असे ते म्हणाले.
आपल्या देशाला हजारो वर्षांची आयुर्वेद, योग, कृषी, स्थापत्य, वास्तुकला, वैदिक गणित याची गौरवशाली संस्कृती असून भारतीय
ज्ञान परंपरेमुळे विद्यार्थ्यांना याची माहिती होईल व त्यांना अभिमान वाटेल असेही कुलगुरू यांनी सांगितले. याविषयी त्यांनी विविध उदाहरणे देखील दिली.
घर, शाळा- महाविद्यालय व परिसरात भाषेचे एकच माध्यम असेल तर विचार करणे, बोलणे सोपे जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलन, अवलोकन व विश्लेषण करण्याची क्षमता अधिक वाढते असे निष्कर्ष असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आपल्या विद्यापीठाने मराठीतून २४ अभ्यासक्रमांची पुस्तके तयार केली असून या धोरणामुळे बदल झाले असून ते प्रत्यक्षात यायला येण्यास थोडा वेळ लागेल असेही कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी सांगत भारतीय विद्यार्थी आत्मनिर्भर होऊन सक्षमपणे जगातील स्पर्धेला सामोरे जाऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला.
परिचय क्लबचे बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी कमिटी चेअरमन प्राचार्य गोकुळ महाजन यांनी तर आभार मिलन मेहता यांनी मानले.
यावेळी डॉ. प्रीती पाटील संपादित रोटरी सेंट्रल न्यूज या क्लब बुलेटीनच्या पहिल्या अंकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र जैन यांची उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम