
रीड्रेसल मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्वरित सुधारित गुणपत्रक द्यावे” – सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांची विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
रीड्रेसल मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्वरित सुधारित गुणपत्रक द्यावे” – सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांची विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी
जळगाव – विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांनंतर रिचेकिंग, रिव्होल्यूशन व रिड्रेसलसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मोठ्या प्रमाणात – अंदाजे ३५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी रिड्रेसल प्रक्रियेत उत्तीर्ण होत आहेत. मात्र, सदर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मेलने सूचना प्राप्त होऊनही सुधारित गुणपत्रक वेळेत मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशी माहिती विद्यापीठ विकास मंचचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी दिली आहे.
चार महिने झाले तरी विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रक नाही!
मार्च-एप्रिल २०२५ मध्ये निकाल प्राप्त झालेल्या आणि मे महिन्यात रिड्रेसल प्रक्रियेच्या मेलद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आज (सप्टेंबर अखेरीस)ही सुधारित गुणपत्रक प्रलंबित आहेत. संबंधित महाविद्यालयांनीही ९ मे २०२५ रोजी विद्यापीठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान
उत्तीर्ण झालेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गुणपत्रक अत्यावश्यक असते. परंतु वेळेत सुधारित गुणपत्रक मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावासह आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अशा स्थितीत विद्यापीठ प्रशासनाची हेळसांड निषेधार्ह असल्याचे मत नितीन ठाकूर यांनी व्यक्त केले.
आधीसभेत होणार तीव्र विचारणा
सदर प्रकाराबाबत २७ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या आधीसभेच्या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जर दोन दिवसांच्या आत संबंधित विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रके वितरित न झाल्यास, ही बाब अधिक तीव्रपणे उपस्थित केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गैरहजर दाखवले गेलेले विद्यार्थी व राखीव निकाल
याशिवाय, अनेक विद्यार्थी परीक्षेला हजर असूनही विविध कारणांनी गैरहजर म्हणून दाखवले जातात, त्यांचे निकाल प्रलंबित ठेवले जातात. त्यासाठीही विद्यार्थ्यांना विनाकारण खेटे मारावे लागतात. तसेच छापील गुणपत्रक देण्यात होणारा विलंबही अत्यंत गंभीर आहे.
विद्यार्थ्यांनी समस्या सिनेट सदस्यांपर्यंत पोहोचवाव्यात
या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विद्यापीठ विकास मंचच्या सिनेट सदस्यांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन नितीन ठाकूर, तसेच सहकारी सिनेट सदस्य दिनेश चव्हाण, अमोल मराठे, प्रा. सुनील निकम, डॉ. दिनेश खरात, स्वप्नाली महाजन व अमोल सोनवणे यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम