रुग्णसेवेत आमूलाग्र बदल घडवत यंत्रणेची भरारी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘थ्री टी एमआरआय मशीन’चे लोकार्पण

बातमी शेअर करा...

रुग्णसेवेत आमूलाग्र बदल घडवत यंत्रणेची भरारी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘थ्री टी एमआरआय मशीन’चे लोकार्पण

 

जळगाव (प्रतिनिधी) – “गेल्या काही वर्षांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णसेवेचा स्तर उंचावला आहे. त्यात आता अत्याधुनिक ‘थ्री टेस्ला एमआरआय मशीन’ची भर पडली असून, ही सेवा रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरेल,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शनिवार, ३ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘थ्री टी एमआरआय मशीन’चे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन होते. या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रगत रेडिओलॉजी विभागाची घडामोड
प्रस्ताविकेत रेडिओलॉजी विभागाचे प्रभारी डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले की, “गेल्या ८ वर्षांत एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन या सेवा सुरू झाल्यानंतर आता एमआरआयसारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्या ही सेवा रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी उपलब्ध असून पुढे ओपीडी रुग्णांनाही दिली जाणार आहे.”

ही सुविधा केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्लूएस योजनेंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात आली आहे.

सुविधांमध्ये गुणात्मक वाढ — मान्यवरांचे गौरवोद्गार
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेगाने होत असलेल्या प्रगतीचे कौतुक करत, “अद्ययावत सेवा ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे सांगितले.
आ. राजूमामा भोळे आणि खा. स्मिता वाघ यांनीही जिल्ह्यातील आरोग्य सेवांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ना. गिरीश महाजन म्हणाले, “मेडिकल कॉलेज सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता एमआरआयसारखी महागडी तपासणी अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहे. ही सेवा सामान्य जनतेसाठी एक मोठा दिलासा ठरेल.”

प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती
कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, डॉ. चंद्रमोहन हरणे, डॉ. इम्रान पठाण, डॉ. जितेंद्र सुरवाडे, मुख्य अधिसेविका जयश्री जोगी यांच्यासह सर्व विभागप्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन निलेश बारी यांनी केले, तर आभार डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी मानले.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम