
रेल्वेची धडक बसून ४८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; खिशात आढळली सुसाईड नोट
जळगाव: खंडेराव नगर येथील रेल्वे पुलावरून रेल्वेची धडक बसून नाल्यात कोसळल्याने मनोज माणिकराव देशमुख (वय ४८, रा. शिवकॉलनी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे.
मनोज देशमुख मंगळवारी सकाळी खंडेराव नगरजवळच्या रेल्वे पुलावरून जात असताना त्यांना रेल्वेची धडक बसली. धडकेमुळे ते थेट पुलाखालच्या नाल्यात कोसळले. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ‘आपदा मित्र’ जगदीश बैरागी यांना माहिती दिली. बैरागी यांनी तात्काळ रामानंद नगर पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
खिशात सापडली चिठ्ठी
पोलिसांना मनोज देशमुख यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात तोडक्या-मोडक्या अक्षरांत ‘मी आत्महत्या करत आहे, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा मजकूर लिहिलेला आहे. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली असून, अधिक तपास सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देशमुख यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांची ओळख पटवली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार शरद वंजारी पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम