रेल्वेत नोकरीचे आमिष; सेवानिवृत्त नागरिकाची १२.५० लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा...

जळगाव शहरात रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत सेवानिवृत्त ६७ वर्षीय नागरिकाची तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

निमखेडी शिवारातील संतोष माणिक चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी २०२१ पासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपींनी त्यांच्याशी सलगी करत विश्वास संपादन केला. शहरातील नवीन बसस्थानकाजवळील चिमुकले राम मंदिर परिसरात ओळख झाल्यानंतर फिर्यादींच्या मुलगा जगदिश चौधरी याला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आकर्षक आश्वासन देण्यात आले.

या प्रकरणात संदिप वसंत भोळे, दिपाली संदिप भोळे (दोघे रा. जिल्हापेठ, जळगाव), धिरज पांडुरंग मुंगलमारे (भंडारा) आणि अण्णा नामदेवराव गोहत्रे (नागपूर) या चौघांनी रोख तसेच ऑनलाइन व्यवहारातून एकूण १५ लाख रुपये स्वीकारले. त्यानंतर जगदिश यांना रेल्वेत नियुक्ती मिळाल्याचा बनावट आदेश देऊन दिशाभूल करण्यात आली.

मात्र प्रत्यक्षात नोकरी न लावताच आणि घेतलेले पैसे परत न करता आरोपींनी केवळ दोन लाख पन्नास हजार रुपये परत केले, तर उर्वरित १२ लाख ५० हजार रुपये हडप केले. फसवणूक लक्षात येताच संतोष चौधरी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी फसवणूक आणि संबंधित गुन्ह्यांची नोंद घेऊन तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम