
लक्झरी बस मोर नदीत कोसळली; दोन ठार, ३० जखमी
लक्झरी बस मोर नदीत कोसळली; दोन ठार, ३० जखमी
फैजपूर-अमोदा मार्गावर भीषण अपघात :
यावल प्रतिनिधी: फैजपूर-अमोदा मार्गावरील मोर नदीच्या पुलाजवळ रविवारी सकाळी इंदोरहून भुसावळकडे येणारी गणेश ट्रॅव्हल्सची खाजगी लक्झरी बस (क्रमांक एमपी-३०-९००९) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. सुमारे १५ फूट खोल नदीपात्रात बस पलटी झाली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अथवा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर काही क्षणांतच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांची मदत केली व बचावकार्य सुरू केले.
जखमींना तत्काळ फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथे हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, आपत्कालीन सेवा, क्रेनच्या सहाय्याने बस हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे, मोर नदी परिसरात गेल्या दोन महिन्यांत हा २८ वा अपघात घडला असून, या मार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम