
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह फरार!
जळगावात तरुणाची २.४४ लाखांची फसवणूक; एजंटसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह फरार!
जळगावात तरुणाची २.४४ लाखांची फसवणूक; एजंटसह चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव: लग्नानंतर नववधू संसाराची स्वप्ने रंगवते, पण जळगावातील एका तरुणाच्या नशिबी मात्र फसवणुकीचा धक्का बसला. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी वधू सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आणि वरपक्षाची तब्बल २.४४ लाख रुपयांची फसवणूक केली.
रामेश्वर कॉलनीतील २७ वर्षीय रिक्षाचालक तरुणाचे विवाह जुळवण्यासाठी त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील एजंट आशाबाई हिच्याशी संपर्क साधला. पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, जि. यवतमाळ) हिला वधू म्हणून दाखवण्यात आले आणि १.६० लाख रुपयांचा व्यवहार ठरला.
१८ फेब्रुवारी रोजी वधू पूजा गावडे, तिची आई निर्मलाबाई डोंगरे, मामा गोपाळ खंडारे व मावसा शिवशंकर हे तरुणाच्या घरी आले. दुसऱ्याच दिवशी तातडीने लग्न लावण्यात आले. पैसे मिळताच एजंट आणि वधूचे नातेवाईक लग्नमंडपातून निघून गेले.
२२ फेब्रुवारी रोजी रात्री घरातील सर्वजण झोपले असताना पूजा गावडे अचानक बेपत्ता झाली. सकाळी पाहणी केली असता, ती ८४ हजार रुपयांचे मणी-मंगळसूत्र, कर्णफुले आणि सोनपोत घेऊन पसार झाल्याचे लक्षात आले.
तरुणाने एजंट आणि वधूच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे आणि शिवशंकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम