
लळिंग घाटात साधूच्या वेषातील टोळीने कुटुंबाला लुटले; मोहाडी पोलिसांनी उत्तराखंडातील आरोपींना ठोकल्या बेड्या
लळिंग घाटात साधूच्या वेषातील टोळीने कुटुंबाला लुटले; मोहाडी पोलिसांनी उत्तराखंडातील आरोपींना ठोकल्या बेड्या
धुळे: जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खासणे गावातील एका कुटुंबाला देवदर्शन करून घरी परतत असताना, धुळे महामार्गावरील लळिंग घाटात साधूच्या वेशात आलेल्या एका टोळीने लुटले. या प्रकरणातील उत्तराखंडातील आरोपींना मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे.
ललिता नरेंद्र पाटील (रा. खासणे, ता. चोपडा) या त्यांच्या कुटुंबासोबत देवदर्शनाहून परत येत असताना धुळे शहराजवळील लळिंग घाटात त्यांच्या वाहनाला एका साधूच्या वेषातील व्यक्तीने थांबवले. ‘पाणी घ्या आणि आशीर्वाद घ्या,’ असे सांगून त्याने कुटुंबातील सदस्यांना गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी खाली उतरल्यानंतर ते त्याच्या पाया पडले.
याच संधीचा फायदा घेत त्याने दोन महिलांना खालीच थांबण्यास सांगितले आणि अचानक चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर, ही टोळी एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून घटनास्थळावरून पसार झाली.
या घटनेनंतर ललिता पाटील यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना, गरताडबारी येथे पोलिसांना साधूच्या वेशात एक संशयित व्यक्ती दिसली. चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने आपले नाव जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (रा. घेसुपुरा, हरिद्वार, उत्तराखंड) असे सांगितले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लूटमारीच्या टोळीत गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे, सौदागर बाबुनाथ नाथसफेरे, विक्की मोसमनाथ नाथसफेरे आणि कांता मोसमनाथ नाथसफेरे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कारही जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम