लाडकी बहीण’ योजनेचा गैरवापर; जळगाव जि.प.चे ७ कर्मचारी लाभार्थी, आता होणार कारवाई

बातमी शेअर करा...

‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरवापर; जळगाव जि.प.चे ७ कर्मचारी लाभार्थी, आता होणार कारवाई

जळगाव: राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजना सर्वसामान्य आणि गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली असताना, शासकीय कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेतील एका पुरुष कर्मचाऱ्यासह सहा महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची माहिती उघड झाल्यानंतर आता त्यांच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे.

राज्यभरात ११८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
‘सेवार्थ आयडी’ या सरकारी प्रणालीवरून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तब्बल ११८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला आहे. या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असतानाही त्यांनी या योजनेचा फायदा घेतला. ही बाब समोर आल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेला या कर्मचाऱ्यांची यादी पाठवण्यात आली आहे.

जळगावमधील सात कर्मचाऱ्यांची नावे उघड
जळगाव जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांची नावे शासनाच्या यादीतून समोर आली आहेत. त्यात एकनाथ चुडामन कोळी, आरती दिलेरसिंग रातपूत, निर्मला गणेश चौधरी, सरीता मोहन मिस्तरी, रत्ना नागो कंखरे, सुनिता युवराज चौधरी आणि विद्या प्रल्हाद खंडारे यांचा समावेश आहे. यापैकी एक कर्मचारी मुक्ताईनगर तालुक्यात ग्रामसेवक असून, तो पुरुष असतानाही त्याने या योजनेचा लाभ घेतला आहे.

प्रशासनाकडून चौकशी सुरू
जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ चंद्रशेखर जगताप यांनी सर्व पंचायत समित्यांना या कर्मचाऱ्यांचे आयडी देऊन माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पगार आयडीवरून या कर्मचाऱ्यांची अधिकृत माहिती घेतली जात आहे.

या गंभीर प्रकरणावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करणवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “संबंधित कर्मचाऱ्यांकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम वसूल केली जाईलच, पण नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशीही केली जाईल.” या प्रकारामुळे सरकारी योजनांचा गैरवापर करणाऱ्यांवर जरब बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम