
लिफ्ट देणे पडले महागात; शालेय विद्यार्थ्याने दुचाकीस्वाराच्या बॅगेतून लंपास केले ४७ हजार ५०० रुपये
लिफ्ट देणे पडले महागात; शालेय विद्यार्थ्याने दुचाकीस्वाराच्या बॅगेतून लंपास केले ४७ हजार ५०० रुपये
पाचोरा: माणुसकीच्या भावनेतून मदत करणे कधीकधी किती महागात पडू शकते, याचे एक धक्कादायक उदाहरण पाचोऱ्यात समोर आले आहे. एका दुचाकीस्वाराने लिफ्ट दिलेल्या शालेय विद्यार्थ्याने त्याच्या बॅगेतून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त केली आहे.
गुरुवारी, पाचोरा शहरातील गंगा सुपर शॉपमधील अकाउंटंट हे दुचाकीवरून भडगाव रोडने येत होते. त्यावेळी मंगल प्रोव्हिजनजवळ एका शालेय विद्यार्थ्याने त्यांना भुयारी मार्गापर्यंत लिफ्ट मागितली. अकाउंटंटने त्याला माणुसकी म्हणून दुचाकीवर बसवले. मात्र, भुयारी मार्ग जवळ आल्यावर त्या विद्यार्थ्याने ‘तुम्ही कुठे जाताय?’ असे विचारले. अकाउंटंटने गंगा सुपर शॉपचे नाव सांगितले. यावर तो विद्यार्थी भुयारी मार्गावर न उतरता गंगा सुपर शॉपजवळ उतरला आणि निघून गेला.
अकाउंटंट शॉपमध्ये पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या बॅगेची चेन उघडी दिसली आणि त्यातील ४७ हजार ५०० रुपयांची रोकड गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ मालकाला ही माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शेजारील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात चोरी करणारा शालेय गणवेशातील विद्यार्थी दिसून आला. पोलिसांनी त्या विद्यार्थ्याच्या शाळेत जाऊन ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायल यांनी विद्यार्थ्याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने रक्कम मानसिंहका इंडस्ट्रीजसमोरील कब्रस्तानमध्ये फेकल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी त्या ठिकाणी शोध घेतला असता, ती रक्कम मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी जवळच असलेल्या महाराष्ट्र गादी भांडारवरील एका युवकाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने ती रक्कम पोलिसांना काढून दिली.
पोलिसांनी ती रक्कम मूळ मालकाला सुपूर्द केली. हा विद्यार्थी पाचोरा तालुक्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले आहे. या घटनेनंतर दुचाकीस्वारांनी अनोळखी व्यक्तींना, विशेषतः शालेय गणवेशातील विद्यार्थ्यांनाही लिफ्ट देताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम