
लोककला लोप पावत चालल्या ,विद्यार्थ्यांनी जतन ,संवर्धनाची जबाबदारी घ्यावी
भारतीय संगीत व नाटक अकादमीचे सदस्य डॉ. जयंत शेवतेकर यांचे प्रतिपादन
लोककला लोप पावत चालल्या ,विद्यार्थ्यांनी जतन ,संवर्धनाची जबाबदारी घ्यावी
भारतीय संगीत व नाटक अकादमीचे सदस्य डॉ. जयंत शेवतेकर यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील लोककला लोप पावत चालल्या असून या लोककलांचा अभ्यास करुन त्या जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन भारतीय संगीत व नाटक अकादमीचे सदस्य डॉ. जयंत शेवतेकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरु झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शेवतेकर बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य, दिनेश खरात, प्राचार्य एस.आर.पाटील, प्रा. कांचन महाजन, नेहा जोशी, लोककलावंत विनोद ढगे, विद्याथी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, कला व मानव्यविद्या प्रशाळेचे प्रमुख डॉ. राम भावसार उपस्थित होते.
डॉ. शेवतेकर पुढे म्हणाले की, लोककला हया भारतीय संस्कृतीचे वाहक आहे. या लोककला जिवंत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अधिसभा सदस्य डॉ. दिनेश खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांना आवाहन केले की, मोबाईल व रिल्स मध्ये वेळ वाया न घालवता लोककला जोपासण्याचे कार्य हाती घ्यावे. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी याप्रसंगी सांगितले की, विद्यापीठाने लोककला विभाग स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्याकरीता प्राधिकरणाचे सदस्य व विद्यापीठ प्रशासन पाठपुरावा करुन लोककला विभाग स्थापन करणेबाबत विद्यापीठ सकारात्मक प्रयत्न करीत आहे.
अध्यक्षीय समारोप करतांना व्य.प.सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी सांगितले की, लोककला व लोकसंस्कृती हे महाराष्ट्राचे वैभव आहे. भारताची सौम्य संपदा लोककले मध्ये आहे. भारत या सौम्य संपदेमध्ये आघाडी घेत आहे. भारतातील भरतनाटयम, कथ्थक, स्थापत्यशास्त्र, महिलांची साडी वेशभूषा, भारतीय चित्रपट यासर्वांचे आकर्षण जगात आहे. भारतातील लोककलांचा अभ्यास जगातील काही देश करीत आहे. लोककलांच्या माध्यमातून सध्या समाजप्रबोधनाचे काम सुरु आहे.
सुरुवातीस डॉ. जयेंद्र लेकरवाळे यांनी लोककला महोत्सवाचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन प्रा.वीणा महाजन तर आभार डॉ. राम भावसार यांनी मानले. सकाळच्या सत्रात लोककलावंत विनोद ढगे यांनी भारुड गीते सादर केली. त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांसमवेत मुक्तसंवाद आयोजित करण्यात आला. या लोककला महोत्सवात ३५ महाविद्यालयातील १३१ विद्यार्थी कलावंतांनी सहभाग नोंदविला.
या लोककला महोत्सवात उत्कृष्ट लोककला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मंचावरील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यामध्ये नंदुरबार जिल्हा उत्कृष्ट विद्यार्थी कलावंत जागृती पाटील (जीटीपी महाविद्यालय, नंदुरबार) व उत्कृष्ट विद्यार्थी कलावंत देविदास पावरा (कला, वाणिज्य व विज्ञन महाविद्यालय, तळोदा), धुळे जिल्हा उत्कृष्ट विद्यार्थी चिराग महाजन (झेङबी.पाटील महाविद्यालय, धुळे) उत्कृष्ट विद्यार्थिनी आदिती शिंदे (आरसी पटेल फार्मसी- पीआयपीआर महाविद्यालय, शिरपूर) तर जळगाव जिल्हा उत्कृष्ट विद्यार्थी संकेत पाटील (जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) उत्कृष्ट विद्यार्थिनी प्रतिभा वळवी (सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव) यांचा समावेश होता.
==

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम