
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती महाविद्यालयात साजरी
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती महाविद्यालयात साजरी
डॉ. अण्णासाहेब बेंडाळे महिला महाविद्यालयात एनएसएस विभागाचं आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे होते. त्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कार्याचा, स्वराज्याच्या मागणीचा व समाजसुधारणेतील योगदानाचा विद्यार्थिनींना परिचय करून दिला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या त्यांच्या घोषणेच्या आठवणीने सभागृहात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ते केवळ साहित्यिक नव्हे तर समाजप्रबोधन करणारे लढवय्ये होते. त्यांनी पारंपरिक लोककथा, पोवाडे, गाणी आणि कथांद्वारे दलित, श्रमिक आणि शोषित घटकांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. सामाजिक न्याय, समता व मानवी हक्क यांचा आग्रह त्यांच्या लेखणीतून सातत्याने व्यक्त झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. राजेश कोष्टी यांनी केले. यावेळी डॉ. विनोद नन्नवरे, एनएसएस विभागाच्या स्वयंसेविका, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जाणीव जागवण्याचे काम केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम