
वकिलांसाठी संरक्षण कायदा, कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा – ॲड. अशोक सावंत
वकिलांसाठी संरक्षण कायदा, कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा – ॲड. अशोक सावंत
जळगाव- वकिलांसाठी संरक्षण कायदा आणि कल्याणकारी योजनां साठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे चेअरमन ॲड. अशोक सावंत यांनी प्रतिपादन केले.
जिल्हा वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयाच्या बाररूमच्या सभागृहात झालेल्या त्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी ॲड. सावंत यांनी वकिलांशी संवाद साधताना शासनाने वकील हिताचे निर्णय घ्यावे यासाठी बार कौन्सिल नेहमी प्रयत्नशील आहे. सेवानिवृत्ती वेतन, व्हेरिफिकेशन, मानधन, नवीन इमारतीचा प्रश्न, पार्किंगची समस्या आदी विविध विषयांवर सविस्तरपणे माहिती दिली.
बार कौन्सिलची कार्यपद्धती, कामकाज, आर्थिक स्थिती, ऑडिट,
सदस्य यादी याविषयी विवेचन केले.
विधी महाविद्यालयांची वाढणारी संख्या बघता हे नवीन वकील तयार करणारे जणू कारखानेच झाले आहे अशी खंत सावंत यांनी व्यक्त करून नवीन वकिलांनी केवळ हा बिन भांडवली व्यवसाय म्हणून याकडे न बघता काळाची आव्हाने ओळखून पारंपारिक वकिली बरोबर नवीन पद्धतीने व तंत्रज्ञानाचा वापर करीत आपले ज्ञान अद्यावत केले पाहिजे असे आवाहन केले.
बार कौन्सिलचे चेअरमनपद हा काटेरी मुकुट आहे. कारण सन्माना बरोबर वकिलांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी देखील असते असे सांगून त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सत्कार हा माझ्या दृष्टीने भावनिक आहे असे शेवटी सांगितले.
प्रास्ताविक अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी तर परिचय उपाध्यक्ष ॲड. स्मिता झाल्टे यांनी करून दिला.सूत्रसंचालन सचिव ॲड. वीरेंद्र पाटील यांनी केले.
कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ वकिल, कोषाध्यक्ष ॲड. प्रवीण चित्ते, सहसचिव ॲड.लीना मस्के या मान्यवरांसह २०० वकिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विविध संस्था,व्यक्ती व विधी महाविद्यालयातर्फे ॲड. सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम