
वक्फ कायदा रद्द होईपर्यंत लढण्यासाठी सज्ज रहा
जळगाव (प्रतिनिधी) – “ना इस्लाम धोक्यात आहे, ना हिंदू, पण भारताचे संविधान मात्र नक्कीच धोक्यात आहे. संविधानविरोधी वक्फ कायदा रद्द होईपर्यंत संघर्ष अटळ असून ही लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी नसून संविधान रक्षणासाठीची आहे,” असे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने जळगाव येथे झालेल्या जलसा ए आम सभेत करण्यात आले.
शुक्रवार, २३ मे रोजी जळगावच्या ईदगाह मैदानावर पार पडलेल्या या भव्य सभेला जिल्ह्यातून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी वक्त्यांच्या आवाहनाला दोन्ही हात उंचावून आणि घोषणांच्या माध्यमातून १०० टक्के पाठिंबा दिला.
प्रमुख वक्त्यांचे भाष्य
या सभेत बोलताना झियाउद्दिन सिद्दीकी (औरंगाबाद), मुफ्ती अशफाक (अकोला), अतहर हुसेन अश्रफी (मालेगाव) यांनी वक्फ कायद्याला संविधानविरोधी ठरवत जनजागृतीसाठी देशभर मोहीम उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केले की, “आमची लढाई कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, तर अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध आहे.”
व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती
या सभेच्या अध्यक्षस्थानी झियाउद्दिन सिद्दीकी होते. त्यांच्यासह मुफ्ती अशफाक, अतहर अश्रफी, मौलाना नूर मोहम्मद, मौलाना समी (जळगाव), मौलाना कारी जहीर, फारुक शेख, डॉ. करीम सालार, मुफ्ती खालीद, मुफ्ती हारून नदवी, एजाज मलिक, युसुफ मकरा, मुफ्ती रमिज, मौलाना हमीद, तौफिक शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
वक्त्यांनी स्पष्ट केले की, वक्फ कायद्याला केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर अनेक हिंदू खासदार आणि वकीलही विरोध करत आहेत. त्यामुळे या कायद्याविरोधातील लढा हा धर्माधारित नसून संविधान रक्षणासाठीचा आहे. यासाठी सर्वधर्मीयांशी संवाद साधण्याचे आवाहनही करण्यात आले.
जनजागृतीसाठी पावले
सभेत वक्फ कायदा संविधान आणि इस्लामविरोधी असल्याबाबत जनजागृती, वक्फ मालमत्तांची नोंदणी, गैरवर्तनाविरोधात कारवाई आणि कायदा रद्द होईपर्यंत सातत्याने लढा देण्याचे ठरवण्यात आले. तसेच लोकसभा-राज्यसभेत या कायद्याला विरोध करणाऱ्या खासदारांचे आभार मानणारा ठरावही सर्वसंमतीने संमत करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारले
सभेची सुरुवात मौलाना उमेर नदवी यांच्या कुराण पठणाने झाली. मौलाना कासिम नदवी यांनी नात सादर केली. डॉ. मोनीज यांनी “आओ हमारे साथ चले” हा तराना सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. हाफिज रहीम पटेल, अनिस शहा, फारुक शेख आदींनी घोषणांनी सभेला रंगत आणली. सूत्रसंचालन मुफ्ती खालीद यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. करीम सालार यांनी केले. शेवटी मौलाना नूर मोहम्मद यांच्या दुआने सभेची सांगता झाली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम