
वरणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल -संजय सावकारे
वरणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल -संजय सावकारे
नदीपुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मयत झालेल्या साकेगाव येथील लक्ष्मण वसंत ठाकरे यांच्या वारसांना शासनातर्फे चार लाख रुपयांची मदत
जळगाव : वरणगाव परिसरात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे, या भागातील भोगवतीला नदीला मोठा पूर आल्यामुळे या परिसरातील शेतक-यांची सर्व पीके पाण्याखाली गेल्याने येथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल, असे आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिले.
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहर व परिसरातील नुकसानग्रस्त भागांची मंत्री श्री सावकारे यांनी आज पाहणी केली, त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
यावेळी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,तहसीलदार नीता लबडे, वरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, नगरपरिषद आदि विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री सावकारे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन आपल्या सोबत असून लवकरात लवकर आपणास नुकसान भरपाई दिली जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला. नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक महसूल प्रशासनास त्यांनी दिले.
मंत्री, संजय सावकारे, यांच्या हस्ते, मौजे साकेगाव ता.भुसावळ येथील लक्ष्मण वसंत ठाकरे हा इसम वाघूर नदीपुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याने या इसमाचे वारस अक्काबाई सुधाकर भिल यांना रु.4,00,000/- यांच्या खात्यात जमा केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.
भोगवती नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यामुळे गावातील घरे, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच पूरामुळे आचेगाव, पिंपळगाव, तळवेल, ओझरखेडा, काहूरखेडा, बोहर्डी व कठोरा या भागांतील संपर्क तुटला असून अनेक घरांची भिंती व अंगणाचे कुंपण पडले आहेत. एका महिलेच्या घरावर भिंत कोसळल्याने ती जखमी झालेबाबत प्राथमिक माहिती मिळाली असता, तहसिलदार भुसावळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली असता, पुराच्या पाण्यामुळे गावातील घरे, दुकाने व सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालेचे दिसून आले स्थानिक प्रशासन यांना तातडीने उपाययोजना करणेबाबत सूचना दिल्या तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरीकांना धीर दिला. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. तसेच या ठिकाणी झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करणेकामी संबंधित मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक सजेवरील ग्राम महसूल अधिकारी, कृषि सहायक व ग्रामसेवक यांनी आज युध्दपातळीवर संयुक्तीक पंचनाम्याचे कामे सुरु केले आहेत,अशी माहिती यावेळी तहसीलदार श्रीमती लबडे यांनी दिली. तसेच नगरपालिकेकडून पंपिंग मशिनद्वारे पाणी उपसा, रस्ते मोकळे करण्याचे व वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भुसावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की, नदी व नाल्याच्या काठावर जाणे टाळावे, नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत पुरविली जात आहे, कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष जळगाव किंवा तहसील कार्यालय भुसावळ येथील आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम