
शिक्षकांचे वरिष्ठ-निवडश्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र रखडले; ‘हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन’ कडून तातडीने मागणी
छत्रपती संभाजीनगर: राज्यातील हजारो शिक्षकांना वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र अजूनही मिळालेले नाही. प्रशिक्षण पूर्ण होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला असूनही प्रमाणपत्रांचा पत्ताच नसल्याने शिक्षकांमध्ये चिंता वाढली आहे. ‘हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन’ने या प्रश्नावर आवाज उठवला असून, प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्रशिक्षण ते प्रमाणपत्र: प्रवासात अडथळेच अडथळे
राज्यातील शिक्षकांचे वरिष्ठ-निवडश्रेणी प्रशिक्षण २ जून ते १२ जून २०२५ या काळात घेण्यात आले होते. हे प्रशिक्षण सुरू झाल्यापासूनच अनेक समस्यांनी वेढलेले होते. ऑनलाइन टेस्ट, सर्वर डाउनची समस्या, तसेच अनेक शिक्षकांची उपस्थिती असूनही त्यांची नावे उपस्थिती पत्रकावर न येणे यांसारख्या तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांना मनस्ताप झाला होता. सर्व अडचणींवर मात करत शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि शासनाच्या निर्देशानुसार वेळेत संशोधन अहवाल व स्वाध्याय वही देखील सादर केली. मात्र, आता सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत आहे.
प्रमाणपत्रातील विलंब वेतनवाढीस अडथळा
या विलंबाबद्दल चिंता व्यक्त करत ‘हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी म्हटले आहे की, “शिक्षकांच्या सेवाविषयक प्रगतीस हा विलंब मोठा अडथळा ठरत आहे. यामुळे त्यांच्या वेतनवाढीच्या प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होत आहेत.” त्यांनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.
शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
या मागणीसाठी शेख अब्दुल रहीम यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मा. राहुल रेखावार आणि शालेय शिक्षण आयुक्त मा. सचिंद्र प्रताप सिंह यांना ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे निवेदन पाठवले आहे. त्यांनी सर्व पात्र शिक्षकांना वरिष्ठ आणि निवडश्रेणीचे प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून त्यांची वेतनवाढीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊ शकेल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम