वाळू माफियांचा थरार : चोपडा तालुक्यात ग्राम महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

बातमी शेअर करा...

वाळू माफियांचा थरार : चोपडा तालुक्यात ग्राम महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

प्रतिनिधी | चोपडा चोपडा तालुक्यातील बुधगाव ते जळोद रस्त्यावर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत असताना ग्राम महसूल अधिकाऱ्यावर ट्रॅक्टरखाली ओढून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (१२ ऑक्टोबर) सकाळी सहा वाजता घडली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, आरोपी ट्रॅक्टर चालक व मालकाविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, तापी नदीपात्रात बुधगाव-जळोद पुलाखाली अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी, संतोष कोळी, सुधाकर महाजन, तिलेश पवार आणि भूषण पवार यांचे पथक पहाटे कारवाईसाठी रवाना झाले.

सकाळी सहा वाजता बुधगाव हद्दीतील पुलाखाली वाळूने भरलेला ट्रॅक्टर दिसताच महसूल पथकाने तो अडवला. चौकशीत ट्रॅक्टर हा बुधगाव येथील अजय कोळी यांचा असल्याचे उघड झाले. चालक पळून गेला, मात्र ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ते तहसील कार्यालयात नेत असताना, रस्त्यात चालक विजय पावरा व मालक अजय कोळी यांनी पथकाला अडवून वाद घातला. वाद वाढताच विजय पावरा याने ट्रॅक्टरवरील अधिकारी अनंत माळी यांना खाली ओढून ट्रॅक्टरखाली टाकण्याचा प्रयत्न केला.

मात्र मंडळाधिकारी रवींद्र माळी यांनी प्रसंगावधान राखून अनंत माळी यांना बाजूला ओढले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला. तरीही त्यांच्या पायाला व कमरेला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी त्यानंतर वाळू खाली ओतून ट्रॅक्टरसह पळ काढला.

जखमी महसूल अधिकाऱ्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मंडळाधिकारी रवींद्र माळी यांच्या फिर्यादीवरून विजय पावरा आणि अजय कोळी यांच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम