
वाह जिंदगी वाह’ ,चोपड्यात अध्यात्म, आनंद आणि मानसिक जागृतीचा प्रेरणादायी संगम
वाह जिंदगी वाह’—चोपड्यात अध्यात्म, आनंद आणि मानसिक जागृतीचा प्रेरणादायी संगम
चोपडा— “जीवन म्हणजे आत्मशोधाचा सुंदर प्रवास असून वर्तमान क्षणातच खरा आनंद दडलेला असतो,” अशा सकारात्मक व प्रेरणादायी संदेशाने सुरू झालेला ‘वाह जिंदगी वाह’ हा अध्यात्मिक आणि मानसिक आरोग्यवर्धक कार्यक्रम प्रभू चिंतन भवन, ओम शांती नगर येथे २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत उत्साहात पार पडला.
राजयोग शिक्षक व समुपदेशक बी. के. रूपेश भाई (माउंट आबू), मिनाक्षी दिदी (जळगाव), राजू भाऊ शर्मा (शिव केला एजन्सी), डॉ. पवन पाटील, डॉ. के. एन. सोनवणे तसेच चोपडा केंद्राच्या संचालिका मंगला दीदी यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेत २७ वर्षे उपशिक्षक म्हणून कार्यरत आर. डी. पाटील यांनी अध्यापनासोबतच मानसिक आरोग्य व अध्यात्मिक संतुलन या विषयांवरील अभ्यासातून मागील दोन वर्षांत व्यावसायिक समुपदेशन प्रशिक्षण पूर्ण केले. अध्यात्मिक समुपदेशक म्हणून त्यांनी पूर्ण केलेले महत्त्वाचे अभ्यासक्रम म्हणजे—
समुपदेशन आणि मानसिक आरोग्य विषयातील प्रगत पदविका (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व ब्रह्माकुमारीज एज्युकेशन विंग),
स्पिरिच्युअल कौन्सिलिंग कोर्स (२५–२७ जुलै २०२५),
तसेच स्टुडंट सायकॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स (NITI आयोग, MSME, Skill India व आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त).
या सर्व कोर्सेस पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार बी. के. रूपेश भाई यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.
प्रेरणादायी मार्गदर्शनात रूपेश भाई म्हणाले की, जीवनाला ‘वाह’ बनवण्यासाठी मनातील नकारात्मकता दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. “८० टक्के आजार हे मनातील विषारी विचारांमुळे होतात. विचार बदलल्यास जीवन बदलते. जसे विचार करतो तसेच आपण घडत जातो. आनंदी राहणे हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे,” असे त्यांनी सांगितले. बदलत्या युगात युवा पिढीसमोर सकारात्मकतेचे उदाहरण ठेवणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अध्यात्म, मानसशास्त्र आणि आनंद या त्रिसूत्रीचा सुंदर मेळ साधणारे हे मार्गदर्शन नागरिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात स्वीकारले. कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादावरून चोपड्यात अशा सकारात्मक व मानसिक आरोग्यवर्धक उपक्रमांची गरज वाढत असल्याचा प्रत्यय मिळाला.
कार्यक्रमाचे मनोवेधक सूत्रसंचालन शितल दीदी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका दीदी, करिश्मा दीदी आणि शितल दीदी यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम