विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू ; भाची गंभीर

बातमी शेअर करा...

विजेच्या धक्क्याने बाप-लेकीचा मृत्यू ; भाची गंभीर

मास्टर कॉलनीतील हृदयद्रावक घटना

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत शुक्रवारी (५ डिसेंबर) सकाळी झालेल्या भीषण दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. उच्चदाबाच्या विजेचा शॉक लागल्याने बाप–लेकीचा जागीच मृत्यू, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी उसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीत राहणारे मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ३५) हे कुटुंबासह वास्तव्य करत होते. शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता मौलानांच्या भाची मारिया फतेमाबी गच्चीवर कपडे टाकण्यासाठी गेली असता, जवळून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा प्रचंड धक्का बसला. तिच्या आरडाओरडीनंतर धावत गेलेल्या मौलानांची मुलगी आलिया (वय १२) हिलाही विजेचा तीव्र शॉक बसला.

दोघींना वाचवण्यासाठी स्वतः मौलाना साबीर गच्चीकडे धावत गेल्यावर त्यांनादेखील विजेचा जबरदस्त धक्का बसला. यात मौलाना साबीर खान आणि त्यांची मुलगी आलिया यांचा मृत्यू झाला, तर भाची मारिया फतेमाबी गंभीर अवस्थेत असून तिला तत्काळ सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत मौलानांचा लहान मुलगा थोडक्यात बचावला. परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, घरांच्या अगदी जवळून जाणारी उच्चदाबाची विद्युत वाहिनी हटवावी, अशी मागणी अनेक महिन्यांपासून होत होती; मात्र महावितरणच्या दुर्लक्षामुळे ही गंभीर घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांत संतापाची भावना व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम