
विद्यापीठाचा २३ डिसेंबर ३४ वा दीक्षांत समारंभ
विद्यापीठाचा २३ डिसेंबर ३४ वा दीक्षांत समारंभ
जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २३ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न होत असून, या समारंभाची तयारी पूर्ण झालेली आहे.
या दीक्षांत समारंभासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी राहणार असून राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद, बंगळूरुचे संचालक प्रा.गणेशन कन्नबीरन यांचे दीक्षांत भाषण होणार आहे.
या समारंभात, एकूण २९ हजार ९७ विद्यार्थ्यांनी समारंभात नोंदणी केली असून. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १२,२५९ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४,५९९ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ६,४१९ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २,२६० स्नातकांचा समावेश आहे. यात स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे २८७, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १२७१, प्रताप महाविद्यालयाचे ८५२, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ९६३, व आर. सी. पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूरचे १८७ अशा एकूण ३,५६० विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील १२० विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या मध्ये ८८ मुले व ३२ मुलींचा समावेश आहे. या समारंभात १९५ पीएच.डी. धारक विद्यार्थी देखील पदवी घेणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाविषयी असलेली आत्मियता लक्षात घेवून व विद्यापीठाचे ब्रँडीग व्हावे या हेतूने या वर्षी सुध्दा पदवी प्रमाणपत्रा सोबत “माझं विद्यापीठ, माझं ज्ञानवैभव” असा मजकूर असलेले स्टिकर स्नातकांना दिले जाणार आहे. ते स्टिकर विद्यार्थ्यांनी आपल्या घरात प्रथमदर्शनी भागात लावणे अपेक्षित आहे.
विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्नातकांसाठी सुचना व डिग्री कोड देण्यात आला आहे. स्नातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी सभारंभाच्या दिवशी प्राप्त झालेली डिग्री कोड, ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरीता पदवी प्रमाणपत्राचे व उत्तरीय वाटप अभ्यासक्रमनिहाय खालील प्रमाणे प्रशासकीय इमारतीत काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दालन क्र. १२९ (परीक्षा भवन तळमजला) खिडकी क्र. १ पीएच्.डी. सर्व विषय, दालन क्र. १०७ (सामान्य प्रशासन, आवक-जावक विभाग):- खिडकी क्र.०२ वर बी.ए. व एम.ए. (सर्व विषय), बी.एसडब्ल्यू., एम.एस.डब्लू., डी.पी.ए., बी.एफ.ए., एम.एफ.ए., दालन क्रमांक १११ (सहायक कुलसचिव प्रशासन यांचे दालन) बी.कॉम., एम.कॉम., आणि सर्व मॅनेजमेंट कोर्सेस, दालन क्रमांक १११ (सहायक कुलसचिव प्रशासन यांचे दालन) बी.एड.आणि एम.एड. एम.ए.-एज्युकेशन, दालन क्रमांक ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) बी. एस्सी. – सर्व विषय, दालन क्रमाक ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) एम.एस्सी.-सर्व विषय, (विद्यापीठ प्रशाळेतील सर्व विद्यार्थी), लॉ. सर्व विषय, दालन क्रमांक ११४ (प्रवेश पात्रता विभाग) बी.ई.- सर्व विषय, बी.टेक. – सर्व विषय, एम. टेक.-सर्व विषय, बी.व्होक. – सर्व सर्व विषय, बी. फार्मसी, एम.फार्मसी.
दीक्षांत समारंभ संपल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे विद्यार्थी या समारंभास उपस्थित राहणार नाहीत अशा गैरहजर विद्यार्थ्यांना २६डिसेंबर, २०२५ ते ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत विद्यापीठाच्या पदवी प्रदान विभागातून कार्यालयीन वेळेत ओळखदर्शक पुरावा दाखवून पदवी प्रमाणपत्र घेता येईल. जे विद्यार्थी एक महिन्यापर्यंत विद्यापीठात येऊन त्यांचे प्रमाणपत्र घेऊन जाणार नाहीत त्यांचे प्रमाणपत्र फेब्रुवारी, २०२६ पासून टपालाव्दारे (स्पीड पोस्ट) टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांची पात्रता पूर्ण केल्याचे पत्र सादर केल्यानंतरच प्रमाणपत्र मिळू शकेल. या विद्यार्थ्यांची यादी ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. समारंभाबाबतचा सर्व तपशील विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेत स्थळावर देण्यात आला आहे. समारंभास्थळी सकाळी ठिक ८.३० वाजता विद्यार्थी व निमंत्रितांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
समारंभात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पँन्ट किंवा पांढऱ्या रंगाचा नेहरु शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे पायजमा तर विद्यार्थिंनीसाठी लाल किनार असलेली पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज किंवा लाल रंगाचा कुर्ता (कमीज) व पांढऱ्या रंगाची सलवार अशा पोशाखात उपस्थित रहावे. दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना विशिष्ठ पोशाखाची सक्ती नाही मात्र भारतीय संस्कृती व परंपरेचा सन्मान राखत नेटका पोशाख करुन उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (live) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनाही बघता यावे यासाठी महाविद्यालयांनी व्यवस्था करावयाची आहे. या बाबत सर्व महाविद्यालयांना सूचना निर्गमीत केलेल्या आहेत.
तसेच विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभास येण्याकरीता शहर बस सेवेची (एस.टी. बस) व्यवस्था असणार आहे आणि विद्यापीठाच्या प्रवेश द्वारा पासून विद्यापीठ प्रशासकीय इमारतीपर्यंत अंतर्गत वाहतुकीसाठी ई-रिक्षा सेवेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम