विद्यापीठाच्या माध्यमातून योग आणि क्रीडा विषयातून उत्तम विद्यार्थी घडतात –खा. स्मिता वाघ

बातमी शेअर करा...

विद्यापीठाच्या माध्यमातून योग आणि क्रीडा विषयातून उत्तम विद्यार्थी घडतात –खा. स्मिता वाघ
जळगाव (प्रतिनिधी) :- विद्यापीठाच्या माध्यमातून योग आणि क्रीडा विषयाशी संबंधित सुरू असलेले उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास पुरक ठरत असून यामाध्यमातून उत्तम विद्यार्थी घडत असल्याचे प्रतिपादन जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केले.

क्रीडा व युवा कल्याण मंत्रालय (भारत सरकार), जिल्हा प्रशासन जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाचा कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील, प्रा. पवित्रा पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, योगशास्त्र विभागाचे विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील आदी उपस्थित होते.

खासदार वाघ पुढे म्हणाल्या की, कोणतेही क्षेत्र असो त्यात सातत्य ठेवणें गरजेचे आहे. तणावमुक्त राहणीमाना करीता किमान एका तर खेळाची आवड जोपासावी. विद्यापीठाचा गेल्या काही वर्षापासून क्रीडा क्षेत्रात प्रगतीचा आलेख वाढला असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च शिखर गाठण्यासाठी हॉकी चे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्यासारखे धीर, तीव्र आवड, चिकाटी, सराव, अचूकता, संयम हे पाच गुण आत्मसात करणे आवश्यक आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या खेळात प्रावीण्य संपादन करून त्यात करीअर करण्याची देखील संधी आहे. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या प्रगतीची माहिती देत सर्वांनी योगा करून निरोगी राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

या कार्यक्रमात योगशास्त्र विभागाचे प्रमुख इंजि. राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचाविशेष अनुदान प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या दिवशी योगशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विद्यार्थी नारायण मांडवडे, जयराम चौधरी, अमरीष चौधरी, योगेश पावरा, शुभम रणदिवे,प्रिंयका मेहता, सारीका नागरे, संकेत पाटील, शितल सोनार, रमेश महाजन, भाग्यश्री पवार व शितल पांडीया या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर एम.ए. योगशास्त्रच्या विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले. यावेळी राज्य क्रीडा मार्गदर्शक (योगासने) चंचल माळी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर तर आभार कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले. उद्घाटन सत्रानंतर योगाभ्यास करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम