
विद्यापीठाच्या योगशास्त्र विभाग येथे योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण
विद्यापीठाच्या योगशास्त्र विभाग येथे योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण
जळगाव (प्रतिनिधी)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभाग येथे योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण तसेच काही गुणवंतांचा गुणगौरव सोहळा दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत योग हॉल, योगशास्त्र विभाग, क ब चौ उमवि, जळगाव येथे संपन्न झाला.
यावेळी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. किशोर एफ. पवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेच्या प्रमुख डॉ. मनीषा इंदाणी, व इंजि. राजेश पाटील हे उपस्थित होते.
ओंकार पूजन व प्रार्थनेने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. डॉ. लीना चौधरी (सहा. प्राध्यापक योग थेरेपी) यांनी ओंकार प्रार्थना सादर केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक इंजि. राजेश पाटील, प्रमुख, योगशास्त्र विभाग यांनी केले. प्रास्ताविकामध्ये इंजि. राजेश पाटील यांनी योगशिक्षक पदविका या अभ्यासक्रमाबद्दल तसेच योगशास्त्र विभागामार्फत उपलब्ध एम. ए. योगशास्त्र, सर्टिफिकेट कोर्स इन मसाज थेरपी तसेच विविध कौशल्य वृद्धिंगत करणारे सर्टिफिकेट अभ्यासक्रमा बाबत माहिती सांगितली.
गुण गौरव सोहळ्यात सुरुवातीला योगशिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्कशीट प्रदान करण्यात आले. अमर हटकर, क्रीडा विभाग, कबचौ उमवि, जळगाव यांचा क्रीडा विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल आणि एकनाथ नन्नवरे यांचा योगशास्त्र विभागात टीचिंग असोसीएट म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कुलसचिव डॉ. विनोद पाटील तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात त्यानंतर शेखर बोरसे सुरक्षारक्षक प्रमुख, कबचौ उमवि, जळगाव यांनी मनोगत व्यक्त करतांना बांभोरी येथील रहिवासी एकनाथ नन्नवरे यांच्या हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन एक सुरक्षारक्षक ते टीचिंग असोसीएट पर्यंतचा प्रवासाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच आपण सुद्धा मेहनत करून उच्च पद गाठू शकतो असे प्रतिपादन केले. यानंतर योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनी प्रिया चौधरी तसेच अनिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यापीठातील योग शिक्षक पदविका अभ्यासक्रम सोपा करून शिकविणारे प्राध्यापक आहेत असे सांगितले. तसेच नोकरी करत असतांना शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग महत्वाचा आहे, असे सांगितले. त्यानंतर अमर हटकर यांनी सेट परीक्षेबद्दल तसेच त्याच्या फायद्यांबद्दल उपस्थितांना समजावून सांगितले. या नंतर एकनाथ नन्नवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षण घेत असतांना आलेल्या अडचणींवर मात करून शिक्षकांच्या सहकार्याने आपण “एक सुरक्षा रक्षक ते टीचिंग असोसीएट” असा आपला प्रवास उपस्थितांना उलगडून दाखविला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर मेहनत करण्याची तयारी व सातत्य असावे लागते. सातत्य असेल तरच आपण कोणतेही उच्च धेय्य गाठू शकतो, असे प्रतिपादन केले. त्यानंतर संचालक डॉ. मनीषा इंदाणी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. निरोगी निरामय आरोग्यासाठी अश्या सर्व विद्यार्थ्यांकडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
सदर गुणगौरव सोहळ्यासाठी विद्यार्थी व सुरक्षारक्षक मिळून जवळपास १०० जण उपस्थित होते. प्रा.गीतांजली भंगाळे, सहा. प्राध्यापक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच प्रा. लिंता चौधरी (सहा. प्राध्यापक) यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी तुषार सोनवणे, माधवी तायडे आणि रत्नाकर सोनार व भगवान साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम