विद्यापीठाच्या ‘शिल्ड टेक’ संघाला स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ मध्ये अखिल भारतीय विजेतेपद

बातमी शेअर करा...

विद्यापीठाच्या ‘शिल्ड टेक’ संघाला

स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ मध्ये अखिल भारतीय विजेतेपद

जळगाव प्रतिनिधी: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था (UICT) मधील ‘शिल्ड टेक’ या विद्यार्थीसंघाने (दिपांशू रहांगडाले, नेत्रदीप कदम, चैतन्य सातपुते, प्राजक्ता लंके, भार्गव रायकऱ आणि साहिल झांबरे) स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२५ मध्ये अखिल भारतीय विजेतेपद पटकावून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा सर्वोच्च तुरा रोवला आहे. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी या विद्यार्थ्यांचा अभिनंदनपर सत्कार केला.

कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली असून त्यांनी हे दाखवून दिले की, ग्रामीण किंवा शहरी भाग अशा सिमा रेषा कुठलाही आविष्कार, नैपुण्य, बुध्दीमत्ता या करीता नसतात. या विद्यार्थ्यांनी या संशोधनाच्या माध्यमातून  खान्देश व विद्यापीठाचा गौरव अधोरेखित केला आहे. अशा प्रकल्पांकरीता विद्यापीठ नेहमी मदत करत राहील तसेच स्टार्टअपमध्ये देखील विद्यापीठ सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.

ही स्पर्धा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व केंद्रीय शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या विद्यापीठाने पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या संघाच्या “एन-फॅन्टम : संरक्षणासाठी स्टेल्थ कोटिंग” या प्रकल्पाने संरक्षण क्षेत्रातील रडार शोधक्षमता, उष्णता व इन्फ्रारेड उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला असून, हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेशी सुसंगत आहे. संघाने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत ₹ (१,५०,०००/-) एक लाख पन्नास हजार रुपयांचे  पारितोषिक प्राप्त केले. अंतिम फेरी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास, चेन्नई येथे ८ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडली.

या विजयी संघात विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्था मधील दिपांशू रहांगडाले, नेत्रदीप कदम, चैतन्य सातपुते, प्राजक्ता लंके, भार्गव रायकऱ आणि साहिल झांबरे यांचा समावेश आहे. भारत सरकारचे विविध विभाग दरवर्षी काही समस्यांवरील उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित करीत असतात. त्यानुसार २०२५ च्या सप्टेंबर मध्ये ही स्पर्धा जाहीर झाली. या स्पर्धेत विद्यापीठाच्या प्रशाळेतील संघानी सहभाग घेणे बाबत प्रस्ताव केसीआयआयएल विभागाने तयार करून कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांना सादर केला. कुलगुरुंनी तत्काळ मान्यता देत प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे यांच्या सहिने केसीआयआयएलने परिपत्रक निर्गमित करुन प्रशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रशाळेतुन विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थेचा संघ निश्चित करण्यात आला.

राष्ट्रीय स्तरवरील या स्पर्धेत एकुंण २७१ समस्या वरील सर्वोत्तम उपाय शोधण्या करिता देशातील आईआईटी व नामवंत उच्च शिक्षण संस्था विद्यापीठे यांच्या ६८७६६ संघानी सहभाग नोंदविला. यातून संरक्षण विभागाच्या वरील समस्येकरिता दोन राउंड सादरीकरण झाले. त्यातुन विद्यापीठ जळगावसह, इंस्टिट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (महाराष्ट्र), दयानंद सागर अभियांत्रिकी कॉलेज बेंगलोर, (कर्नाटक), ए. सी. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराईकुड़ी, एम. कुमारस्वामी अभियांत्रिकी महाविद्यालय, करूर (तमिळनाडु) हया अंतिम ५ संघ निवडण्यात आले. यासंघातून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UICT) मधील ‘शिल्ड टेक’ या विद्यार्थीसंघाची अंतिम निवड़ करण्यात आली.
या संघाला पेंट टेक्नॉलॉजीचे विभागप्रमुख डॉ. रवींद्र पुरी,  डॉ. उदय बागले (संघ मार्गदर्शक), प्रा. हर्षला कापड़णे, डॉ. भुषण बी. चौधरी (UICT समन्वयक), डॉ. राजकुमार शिरसम आणि डॉ. तुषार देशपांडे,  kciilचे राजेश जवळेकर, डॉ. नविन खंडारे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी या यशाबद्दल विद्यापीठाचे  कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. तसेच विद्यापीठीय रसायन तंत्रज्ञान संस्थचे संचालक प्रा. अजय गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, ही कामगिरी UICT मधील संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख शिक्षणाची मजबूत परंपरा दर्शविते, असे नमूद केले. ही यशोगाथा विद्यापीठाच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देणारी असल्याचे मान्यवरांनी  सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम