विद्यापीठात ‘आविष्कार–२०२५’ स्पर्धा; दोन टप्प्यांत होणार आयोजन

बातमी शेअर करा...

विद्यापीठात ‘आविष्कार–२०२५’ स्पर्धा; दोन टप्प्यांत होणार आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : संशोधन व नवोन्मेषाला चालना देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘आविष्कार–२०२५’ ही स्पर्धा यावर्षी दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्रशालेस्तरीय स्पर्धा ४ डिसेंबर रोजी होणार असून जिल्हास्तरीय फेरी ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी पी. आर. हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव येथे; धुळे जिल्ह्यासाठी झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी विद्यापीठ संचलित कला-विज्ञान महाविद्यालय, मोलगी व आदिवासी अकादमी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी अकादमी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.

यानंतर विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी ३० व ३१ डिसेंबर रोजी विद्यापीठ परिसरात पार पडेल. या स्पर्धेत पदवी, पदव्युत्तर आणि पोस्ट-पदव्युत्तर असे तीन स्तर असणार असून सहा विषयगटांमध्ये स्पर्धा घेण्यात येईल. यात मानवविज्ञान, भाषा आणि ललितकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, कृषी व पशुपालन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच औषधीनिर्माण आणि वैद्यकशास्त्र या क्षेत्रांचा समावेश आहे.

सहभागी विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क २०० रुपये ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी यावर्षी बक्षीस रकमेतील वाढ करण्यात आली असून पदवी व पदव्युत्तर स्तरावर पहिले पारितोषिक २,००० रुपये, दुसरे १,५०० रुपये आणि तिसरे १,००० रुपये असेल, तर पोस्ट-पदव्युत्तर स्तरावर पहिले पारितोषिक २,००० आणि दुसरे १,५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना आकर्षक अधिछात्रवृत्ती देण्यात येणार असून पदवी व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३५,०००, ३०,००० व २५,००० रुपये मिळणार आहेत. तर पोस्ट-पदव्युत्तर स्तरावरील विजेत्यांना दोन वर्षांसाठी अनुक्रमे १,२०,००० व १,००,००० रुपयांची अधिछात्रवृत्ती मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय फेरीत सहभागी विद्यार्थ्यांना १० गुण किंवा समकक्ष क्रेडिटही दिले जाणार आहे.

प्रशालेय स्तरावर सहभागासाठी प्रा. विशाल पराते व डॉ. संदीप भामरे, जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी प्राचार्य उदय जगताप, डॉ. दीपक बोंडे, डॉ. स्वप्नील खरे, धुळे जिल्ह्यासाठी प्राचार्य वर्षा पाटील, डॉ. रवींद्र महाले, डॉ. समाधान पाटील, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी प्रा. किशोर पवार, डॉ. स्मिता देशमुख व डॉ. योगेश राणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे प्रमुख म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, उपप्रमुख प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे आणि कुलसचिव डॉ. विनोद पाटील तर समन्वयक डॉ. नवीन दांदी व उपसमन्वयक डॉ. अमरदीप पाटील असून विद्यार्थी विकास संचालक व स्पर्धेचे सचिव डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी ही माहिती दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम