
विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन
विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सव २०२५ स्पर्धेचे आयोजन दि. ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यभरातून तब्बल २६ विद्यापीठे सहभागी होणार असून यात १४०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. वंदे मातरम या गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याने वंदे मातरम@१५० या थीमवर या महोत्सवाचे आयोजन होत आहे.
राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मा. राज्यपाल महोदयांनी आंतरविद्यापीठ स्तरावर इंद्रधनुष्य ही कला व सांस्कृतिक स्पर्धा सुरु केली आहे. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. सहभागी होणाऱ्या १४३०विद्यार्थी / संघ व्यवस्थापक यांना रंगमंचावरील सोयी / सुविधांसह इतर सर्व व्यवस्थांकरीता विविध ३८ समिती नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्यांमध्ये विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुंसह, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, कुलसचिव, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी/कर्मचारी अशा एकूण ३१० सदस्यांचा समावेश आहे. इंद्रधनुष्य-२०२५ युवक महोत्सव स्पर्धेच्या लोगोची संकल्पना राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परीषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी केली असून नुकतेच त्याचे अनावरण करण्यात आले आहे.
युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२५ मध्ये ५ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १) संगीत विभागात – भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य संगीत (तालवाद्य,स्वर वाद्य) नाट्यसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूह गान, भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद, पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य संगीत, पाश्चिमात्य समूह गान २) नृत्य विभागात – भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोकसमूह नृत्य ३) वाड्मयीन कलाप्रकार – वकृत्व वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा ४) रंगमंचीय कला प्रकार – एकांकिका, प्रहसन, मूकअभिनय, नक्कल, लघुपट, ५) ललित कला प्रकारात – स्थळ चित्र, चिकट कला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्रे, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, इन्स्टॉलेशन या कला प्रकारांचा समावेश आहे.
या महोत्सवाची जय्यत तयारी विद्यापीठातर्फे करण्यात आली असून यावर्षी युवकांमध्ये देशभक्ती ची भावना जागृत करण्यासाठी महोत्सवात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत. रंगमंच क्रमांक १ – बंकिमचंद्र चटोपाध्याय, रंगमंच क्रमांक २ – स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, रंगमंच क्रमांक ३ – नेताजी सुभाष चंद्र बोस, रंगमंच क्रमांक ४ – क्रांतिवीर खाजा नाईक सभागृह, रंगमंच क्रमांक ५ – शिरीष कुमार मेहता सभागृह अशी स्वातंत्र्यसेनानींची नावे देण्यात आली आहेत. हा महोत्सवाचे आयोजन यशस्वीरित्या होण्या करीता समितींच्या बैठका व कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम