
विद्यापीठात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवाचे आयोजन
उदघाटन डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते दि. ४ मार्च रोजी होणार
विद्यापीठात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवाचे आयोजन
उदघाटन डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते दि. ४ मार्च रोजी होणार
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने दि. ४ व ५ मार्च रोजी विद्यापीठात लोकशाहिर अण्णाभाऊ साठे लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्यांदाच या प्रकारचा लोककला महोत्सव विद्यापीठातर्फे आयोजित केला जात आहे. या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या हस्ते दि. ४ मार्च रोजी होणार आहे.
या लोककला महोत्सवाचा उद्घाटन समारंभ कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य तथा समारंभाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि कला व मानवविज्ञान प्रशाळा यांच्या वतीने विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडीयम मध्ये हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात लोकनृत्य, गायन व इतर अशा ३ कला प्रकारात संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सादरीकरण करता येईल. लोकनृत्यामध्ये खान्देशातील तमाशा, रोडाली, भवानी नृत्य, वीरनृत्य (शेंडी कार्यक्रमात केले जाणारे नृत्य), सिबली नृत्य, पावरा नृत्य, खान्देशी, कोकणी, आदिवासी नृत्य यांचा समावेश राहील. गायनामध्ये वहीगायन, खान्देशातील पोवाडा, खान्देशातील लग्नगीते, कानबाईची गाणी, जात्यावरची गाणी, लळीत यांचा समावेश राहील. इतर मध्ये गोट- खान्देशातील बोलीभाषेतील कथा सांगणे, किलरी वादन या कला प्रकारांचा समावेश राहील. सहभागी विद्यार्थी आपल्या भोवतालच्या लोकसंस्कृती व लोक कलांबाबत पोस्टर प्रदर्शन देखील करू शकतील. मात्र लोककला सादरीकरण व पोस्टर प्रदर्शन या पैकी किमान एका कला प्रकारात भाग घेणे आवश्यक असेल.
या महोत्सवात खान्देशातील अर्थात जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील लोककला व लोकसंस्कृतीवर अधिक भर असेल. लोककलावंताचे व्याख्यान, परिसंवाद व सादरीकरण होणार आहे. प्रत्येक महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांना (३ विद्यार्थी व ३ विद्यार्थिंनी) या महोत्सवासाठी पाठवावेत असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले आहे. महाविद्यालयांनी ३ मार्च पर्यंत प्रवेशिका पाठविणे आवश्यक आहे. संपर्कासाठी डॉ.राम भावसार (प्रभारी संचालक कला व मानवविद्या प्रशाळा, विद्यापीठ) आणि सुचित्रा लोंढे (नाट्यशास्त्र विभाग, विद्यापीठ) यांच्याशी संपर्क साधता येईल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम