
विद्यार्थिनीचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला
विद्यार्थिनीचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावला
जळगाव : शहरातील प्रभात चौकात १ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एका विद्यार्थिनीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल येथील सानिका अमोल पाटील (वय २०) ही विद्यार्थिनी शिक्षण घेते. १ ऑक्टोबर रोजी दुपारी ती एम.जे. कॉलेजजवळून बस स्टँडकडे पायी जात असताना प्रभात चौकात मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी तिच्या हातातील मोबाइल हिसकावला. सानिकाने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. घाबरलेल्या अवस्थेत तिने तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे जिल्हापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ मिलिंद सोनवणे करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम