
विद्यार्थ्यांनी केला ऐतिहासिक वारस्यासह सामाजिक जाणिवेचा अभ्यास
विद्यार्थ्यांनी केला ऐतिहासिक वारस्यासह सामाजिक जाणिवेचा अभ्यास
श्रीपतराव भोसले काॅलेजच्या विद्यार्थ्यांची ‘नळदुर्ग’ व ‘आपलं घर’ला भेट
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. विद्यार्थ्यांध्ये या प्राचीन ऐतिहासिक वारस्याबद्दल तसेच सामाजिकतेबद्दल जाणीव निर्माण व्हावी या हेतूने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेतील विद्यार्थ्यांनी नळदुर्ग किल्ल्यावर अभ्यास भ्रमंती केली. व नळदुर्गजवळच अनाथ मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘आपलं घर’ या बालगृहालाही भेट दिली.
प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व उपप्राचार्य संतोष घार्गे यांच्या हस्ते गाडीचे पुजन करुन या अभ्यास सहलीचा प्रारंभ झाला. कला वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा.कैलास कोरके यांनी विद्यार्थ्यांना सहल आयोजित करण्यामागचा हेतू सांगितला. तर सहल विभाग प्रमुख प्रा.शंकर गोरे यांनी सहलीबाबत सुचना दिल्या.
नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असून मध्ययुगीन दुर्गस्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. स्थानिक दंत कथेनुसार या किल्ल्याचा संबंध थेट पौराणिक काळातील नळ-दमयंतीशी व खंडोबा देवाशी जोडला जातो. सध्याच्या किल्ल्याची उत्तम बांधणी इब्राहिम आदिलशहा दुसरा याच्या काळात झालेली आहे. दुर्गाच्या तिन्ही बाजूंनी बोरी नदीचे नैसर्गिक कवच व एका बाजूने किल्ल्याच्या संरक्षणासाठी खंदक खोदलेला आहे. या किल्ल्याचा विस्तार जवळपास 105 एकरवर आहे. किल्ल्याच्या संरक्षणार्थ सभोवताली तटबंदी असून तटबंदीस भक्कम असे 114 बुरुज आहेत.
प्रारंभी तुळजापूरजवळील मद्गलेश्वराचे दर्शन घेवून सहल नळदुर्गला पोहोचली. जवळपास सहा तास चाललेल्या या अभ्यास भ्रमंतीमध्ये विद्यार्थ्यांनी नळदुर्ग किल्ला जवळून पाहिला. किल्ल्यावर फिरत असताना तेथील बारकावे प्रा.डाॅ.मनोज डोलारे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. किल्ल्यात प्रवेश करत असताना शत्रूंसाठी असलेला चकवा, दोन तटबंदीच्या मध्ये लपलेला मुख्य हुलमुख दरवाजा, किल्ल्यातील सर्वात उंच उपळी बुरुज, बारुदखाना, वैशिष्ट्यपूर्ण पाकळ्यांचा नऊ बुरुज, परंडा बुरुज, संग्राम बुरुज, पुणे बुरुज, स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेला पाणी महाल, नरमादी धबधबा, जामा मशीद, बारादरी, अंबरखाना, रंगमहाल, हमामखाना, हत्ती तलाव, मछली तट, मुन्सीफ कोर्ट, दरबार महाल, श्री खंडोबा स्थान, सराया, बाजूलाच असणारा रणमंडळ किल्ला, तटबंदीवरील फांजी, चर्या, जंग्या, किल्ल्यावरील विविध तोफा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच तत्कालीन काळातील लोकजीवन, सैनिकीजीवन, नर व मादी धबधब्यातील वेगळेपण, धरणात असणारा पाणी महाल, पाण्याच्या दाबावर चालणारी पीठाची चक्की तसेच चालुक्य काळापासून इब्राहिम आदिलशहाच्या कालखंडापर्यंत किल्ल्यात होत गेलेले बदल याचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली. तर प्रा. सूर्यकांत कापसे यांनी नळदुर्ग किल्ल्यामध्ये झालेल्या वेगवेगळ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.श्री खंडोबा देवाचे महात्म्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रा. दत्तात्रय जाधव यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात असणारे किल्ल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. विशेष म्हणजे सध्या नरमादी धबधबा ओसंडून वाहत आहे. त्याचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच उपळी बुरुजामध्ये दुर्मीळ समजले जाणारे शेपटीचे रायनोकोमा हार्डविकी वटवाघूळांचे दर्शन अनेक विद्यार्थ्यांना झाले.
नळदुर्ग किल्ल्याच्या अभ्यासानंतर विद्यार्थ्यांनी मैलारपूरच्या खंडोबारायाचे दर्शन घेतले. नळदुर्ग मैलारपूर या नावाने देखील ओळखले जाते. मैलार म्हणजे मल्हारी अर्थात खंडोबा. त्यामुळेच मैलारपूर हे नाव पडले असावे.
तारीख-ई-फरिश्ता या ग्रंथातील उल्लेखानुसार हा नळ राजा खंडोबाचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अणदूर या गावी येवून गेला. तो खंडोबाचा उपासक होता नळ राजाची पत्नी दमयंती अतिशय धार्मिक होती.
खंडोबारायाच्या दर्शनानंतर तेथून दोन किमी अंतरावर असलेल्या, अनाथ मुलांचा आधारवड बनलेल्या ‘आपलं घर’ या बालगृहाला विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथील अधिक्षक विलास वकील यांनी संस्थेचा इतिहास व संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. हजारोंचे बळी घेणाऱ्या 1993 च्या लातूर-धाराशिव भूकंपाने काही सामाजिक प्रश्नही जन्मास घातले. त्यातलाच एक म्हणजे भूकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांचा. त्यांचा सांभाळ कोणी करायचा, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून जेष्ठ सामाजिक विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या पुढाकाराने ‘आपलं घर’ संस्था आकारास आली. या क्षेत्रभेटीदरम्यान पन्नालाल सुराणा यांचीही भेट झाली त्यांचेही अनमोल मार्गदर्शन आम्हाला लाभले. त्यांनी सांगितले, की संस्थेने या मुलांबरोबरच कालांतराने विविध कारणांनी अनाथ होणाऱ्या शेकडो मुलांना मायेची ऊब दिली. जीवनमूल्ये रुजविण्याबरोबरच समाजभान देणारे उपक्रम राबविणारी संस्था म्हणून तिची ओळख आहे.
संस्थेच्या या कार्यशैलीतून अनाथांच्या संगोपनाबरोबरच, जातिभेद निर्मूलन, धर्मनिरपेक्षता ही जीवनमूल्ये या अभ्यासभेटीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. अंधश्रद्धा निर्मूलनापासून ते लिंगभाव समानतेपर्यंतचे समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टिकोनानातून ही क्षेत्रभेट अत्यंत उपयुक्त ठरली. अनमोल माहितीचा खजिना मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वारस्याबद्दल व सामाजिक जाणीवेबद्दल भान निर्माण करून देणारी ही सहल यशस्वी करण्यासाठी प्रा.शंकर गोरे, प्रा.सूर्यकांत कापसे, प्रा.दत्तात्रय जाधव, प्रा.डाॅ.मनोज डोलारे, प्रा.सौ.सविता जाधव यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम