
विद्यार्थ्यांमधील देशभक्ती वाढीसाठी भारत विकास परिषदेचा उपक्रम उपयुक्त – उद्योजक हरीश यादव यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांमधील देशभक्ती वाढीसाठी भारत विकास परिषदेचा उपक्रम उपयुक्त – उद्योजक हरीश यादव यांचे प्रतिपादन
समूहगान, प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
जळगाव – येथील भारत विकास परिषदेने भारत को जानो या प्रश्नमंजुषा व राष्ट्रीय समूहगान स्पर्धेचे केलेले आयोजन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या देशभक्ती वाढीसाठी उपयुक्त आहे असे जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक व उद्योजक हरीश यादव यांनी प्रतिपादन केले.
रिंगरोडवरील महेश प्रगती सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
जगात भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत आहे. सर्वच क्षेत्रात होणारे परिवर्तन पाहणारी ही भाग्यवान पिढी आहे असे यादव यांनी सांगून विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांची शिस्त व कठोरता आली पाहिजे विद्यार्थ्यांनी संस्कारांबरोबर स्वतःला घडविले पाहिजे तसेच कर्तव्यांचे पालन करावे असेही त्यांनी सांगितले.
वाचनात मोठी ताकद असते.स्पर्धेतीलच नव्हे तर जीवनातील यश अपयश पचवता यायला हवे असे सांगत आयोजकांचे कौतुक करून सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना यादव यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात अध्यक्ष हेमांगीनी महाजन यांनी या स्पर्धेच्या लेखी परीक्षेत तीन हजार विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी भारत को जानो या स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळवलेल्या संघातील पाळधीच्या स. न. झंवर विद्यालया मधील प्रतीक पाटील या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले.
माजी अध्यक्ष प्रशांत महाजन यांच्या हस्ते हरीश यादव यांचा सत्कार करण्यात आला. परिचय राजेश महाजन यांनी तर गणेश वंदना आणि वंदे मातरम प्राजक्ता दंडगव्हाळ यांनी सादर केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन अंजली हांडे यांनी तर आभार सचिव डॉ.अनुपम दंडगव्हाळ यांनी मानले.
व्यासपीठावर प्रांतपालक तुषार तोतला, संस्कार विभाग संयोजक व प्रकल्प प्रमुख संजय हांडे, कोषाध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेसाठी मुकेश हासवानी, अमर कुकरेजा, मिलन मेहता यांचे सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी भारत विकास परिषदेच्या जळगाव शाखेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम