
विनापरवाना रासायनिक खतांची काळाबाजारात वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
विनापरवाना रासायनिक खतांची काळाबाजारात वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
कृषी विभागाच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल
भडगाव (प्रतिनिधी) – विनापरवाना व कोणतीही अधिकृत नोंदणी न करता रासायनिक खते काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असलेल्या ट्रकवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करत सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कृषी विभागाच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव शहरातील स्वामी अॅग्रो या किरकोळ कृषी सेवा केंद्रातून ईफको कंपनीचे युरिया खत कोणतेही बिल, डिलिव्हरी चलन अथवा ऑनलाईन नोंदणी नसताना नाशिक जिल्ह्यातील एका कृषी सेवा केंद्राकडे बेकायदेशीरपणे वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजेपासून भडगाव शहरातून संबंधित ट्रकचा पाठलाग सुरू करण्यात आला.
कजगाव मार्गे चाळीसगावकडे निघालेला हा ट्रक हिरापूर गावाजवळील साईनाथ भारत पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास अडविण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकचालक नाजीम रहीम शिसगर (वय ४३, रा. हनुमान नगर, ता. चांदवड, जि. नाशिक) याच्याकडे रासायनिक खत वाहतुकीसाठी आवश्यक असलेले कोणतेही कागदपत्र नसल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत सदर खत भडगाव येथील स्वामी अॅग्रो येथून भरल्याची कबुली चालकाने दिली.
ट्रकमध्ये ईफको कंपनीचे युरिया खताचे एकूण २५ टन वजनाचे ५५० बॅग आढळून आल्या. प्रत्येक बॅग ४५ किलो वजनाची असून या संपूर्ण मालाची अंदाजे किंमत १ लाख ४६ हजार ३०० रुपये इतकी आहे. हा सर्व मुद्देमाल जप्त करून भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दिगंबर रामभाऊ तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चालक नाजीम रहीम शिसगर, स्वामी अॅग्रो सेवा केंद्राचा मालक (पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही) आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ७, ८, १९, २४, २५ व २६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, जिल्ह्यातील अवैध खत साठवणूक व काळाबाजाराविरोधात प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम