
विनापरवाना वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; चालक व मालकावर गुन्हा
विनापरवाना वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले; चालक व मालकावर गुन्हा
रामानंदनगर पोलिसांची कारवाई; डंपर आणि ३ ब्रास वाळू जप्त
जळगाव : शहराजवळील मोहाडी रस्त्यावर रामानंदनगर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत विनापरवाना वाळू वाहतूक करणारे एक डंपर पकडण्यात आले असून, चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना, संशयास्पदरीत्या फिरणारे डंपर (क्रमांक एमएच-१९, सीएक्स-२७६८) वाळू वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी डंपर थांबवून चौकशी केली असता, चालक शेख शाहरूख शेख निसार (रा. आव्हाणे) हा वाळू वाहतुकीसंबंधी कोणताही परवाना दाखवू शकला नाही. अधिक तपासणीअंती हे डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर पोलिसांनी डंपर आणि त्यावरील अंदाजे ३ ब्रास वाळू जप्त केली. या प्रकरणी चालक शेख शाहरूख शेख निसार आणि डंपरचे मालक ललित रमेश चौधरी यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम