
विरोधकांना पक्षात घेऊन त्रास कमी करा ; भाजप स्वबळावरही लढण्यास तयार
विरोधकांना पक्षात घेऊन त्रास कमी करा ; भाजप स्वबळावरही लढण्यास तयार
ना. गिरीश महाजन यांचा जामनेर येथील कार्यशाळेत विरोधकांना टोला
जामनेर : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुती करून लढायच्या, अन्यथा भाजप स्वबळावरही लढण्यास तयार आहे. विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांना पक्षात घेऊन स्वागत करा. शून्यातून आपला पक्ष उभा केला आहे, त्यामुळे जास्त त्रास देणाऱ्या विरोधकांना लवकर पक्षात घेतले तर आपला त्रास कमी होईल, असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
शहरातील श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालयात सेवा पंधरवड्याच्या नियोजनासाठी भाजप जळगाव पूर्व जिल्ह्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संजय गरूड, डॉ. केतकी पाटील, नंदकिशोर महाजन, अॅड. शिवाजी सोनार, सुरेश धनके, डॉ. राजेंद्र फडके, छगन झाल्टे, जे.के. चव्हाण, अजय भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबरच्या जन्मदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोबर जयंतीपर्यंत देशभर सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे. या काळात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा, नमो युवा रन मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, सामाजिक मदतकार्य आणि आत्मनिर्भर भारतासाठी जनजागृती उपक्रम राबवले जातील. या कार्यशाळेत उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी तरुणांच्या मानसिकतेवर भाष्य करताना सांगितले की, आजची पिढी सशक्त व्हायला हवी; मात्र सहनशीलतेअभावी अनेक तरुण आत्महत्येकडे वळतात. युवकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी संसद खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आमदार सुरेश भोळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, शिवसेना (उबाठा गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) येथील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत बाविस्कर यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम